
सोलापूर, 22 मे (हिं.स.)। पंढरपुर येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाळूमाफियांनी धक्कादायक प्रकार केल्याचा आरोप समोर आला आहे. चंद्रभागा नदीतील पाणी वाहून जावे आणि उघड्या पडलेल्या वाळवंटातील वाळू चोरी करता यावी, यासाठी विष्णुपद बंधाऱ्याचे दरवाजे काढून टाकल्याचे उघड झाले आहे.गणेश अंकुशराव यांनी विष्णुपद बंधाऱ्याची पाहणी केली असता बंधाऱ्याचे गेट काढून फेकण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
या प्रकारामुळे नदीपात्रातील पाणी वेगाने वाहून जात असल्याचेही त्यांनी सांगितले.सध्या अधिक मास सुरू असून विठ्ठल रुक्मिणी मंदिर दर्शनासाठी दररोज लाखो भाविक पंढरपुरात येत आहेत. मात्र बंधाऱ्याचे दरवाजे नसल्याने चंद्रभागा नदीतील पाणी कमी होत असून वारकरी भाविकांच्या स्नानासाठी अडचणी निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.या प्रकरणात शासनाने तातडीने हस्तक्षेप करून बंधाऱ्याची दुरुस्ती करावी तसेच संबंधित आरोपींचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी गणेश अंकुशराव यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड