निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करावे : आयुक्त दिनेश वाघमारे
नाशिक , 22 मे (हिं.स.)। मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने 20 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद
निवडणूक प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी परस्पर समन्वयाने काम करावे : आयुक्त दिनेश वाघमारे


नाशिक , 22 मे (हिं.स.)।

मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने 20 जून 2026 रोजी मतदान होणार आहे. मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने कामकाज करावे, तसेच मतदानाच्या दिवशी मतदारांना आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यावर विशेष भर द्यावा, असे निर्देश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी यावेळी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात मनमाड नगरपरिषद तसेच देवळा व पेठ नगरपंचायतीतील रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांच्या अनुषंगाने आढावा बैठक घेऊन निवडणूक तयारीचा त्यांनी सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ. डि.एस. स्वामी, उपजिल्हाधिकारी शुभांगी भारदे, नगरपालिका शाखेचे सह आयुक्त शाम गोसावी, सहाय्यक आयुक्त स्नेहल विसपुते, मनमाड नगरपरिषदेचे मुख्याधिकारी शेषराव चौधरी, पेठ नगरपंचयातचे मुख्याधिकारी चेतन विसपुते, देवळा नगरपंचायत मुख्याधिकारी प्रमोद ढोरजकर उपस्थित होते.

बैठकीत मनमाड नगरपरिषदेमधील २ पदे, देवळा नगरपंचायतीतील १ पद आणि पेठ नगरपंचायतीतील १ पद अशा एकूण ४ रिक्त पदांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या पदांसाठी 20 जून रोजी होणाऱ्या निवडणूक यंत्रणेची तयारी, आवश्यक मनुष्यबळ आणि साहित्य उपलब्धतेचा आढावा घेतला. राज्य निवडणूक आयुक्तांनी संबंधित क्षेत्रांतील संवेदनशील, अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची स्थिती, त्या ठिकाणी करण्यात येणाऱ्या विशेष उपाययोजना तसेच निवडणूक काळातील कायदा व सुव्यवस्था व्यवस्थापनाबाबतची माहिती जाणून घेतली. मतदान केंद्रांवर मतदारांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी पिण्याचे पाणी, वीज, स्वच्छतागृह, रॅम्पसह दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या तयारीचाही त्यांनी आढावा घेतला.

यासोबतच प्रत्येक निवडणूक केंद्रातील मतदारसंख्या, मतदान केंद्रांची संख्या, प्राप्त झालेली नामनिर्देशन पत्रे, निवडणूक प्रक्रियेसाठी आवश्यक मनुष्यबळाचे नियोजन, प्रशिक्षण व्यवस्था आणि निवडणूक साहित्याची उपलब्धता याबाबतची माहिती संबंधित अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली.

---------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande