
- परिचारिका संघटनेकडून निवेदन, सुरक्षा उपायांची मागणी
अमरावती, 22 मे (हिं.स.)
जिल्हा सामान्य रुग्णालयातील एका महिला नर्सवर झालेल्या शारीरिक व आर्थिक अत्याचाराच्या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे. या प्रकरणात प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली नसल्याचा आरोप करत महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, अमरावती शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी आज माजी पालकमंत्री तथा काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन सादर केले.यावेळी संघटनेच्या प्रतिनिधींनी महिला परिचारिकांवरील वाढते अत्याचार, रुग्णालयातील अपुरी सुरक्षा व्यवस्था तसेच प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन यशोमती ठाकूर यांनी तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून संबंधित प्रकरणात योग्य कारवाई करण्याचे आश्वासन दिले.तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील महिला नर्सेसच्या सुरक्षेसाठी डीपीसी निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि इतर आवश्यक सुरक्षा उपाय तत्काळ राबविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी परिचारिका संघटनेने आंदोलन सुरू ठेवण्याचा इशाराही दिला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी