
जळगाव , 22 मे (हिं.स.)शहरात वाढत्या वाहन चोरीच्या घटनांना चाप लावण्यासाठी जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने एक मोठी कारवाई करत सिंधी कॉलनी रस्त्यावरून चोरीला गेलेल्या दुचाकीचा छडा लावला. याप्रकरणी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून तब्बल १ लाख ८७ हजार रुपये किमतीच्या चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहे.महेंद्र गोपाल चव्हाण (वय २३, रा. खोटेनगर, जळगाव) आणि मुकेश ताराचंद चव्हाण (वय २६, रा. पिंप्राळा हुदको, जळगाव) यांना ताब्यात घेलेल्या चोरट्यांचे नाव असून या कारवाईने वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली.
याबाबत असे की, वाघनगर परिसरातील रहिवासी संतोष राणछोड सेंदाणे यांची ‘होंडा शाईन’ (MH 19 CL 7558) ही मोटारसायकल सिंधी कॉलनी रोडवरील समर्थ हॉस्पिटल परिसरातून अज्ञात चोरांनी लांबवली होती. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. शहरातील वाहनचोरीचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तांत्रिक तपास सुरू केला. समर्थ हॉस्पिटल परिसर आणि शहरातील इतर भागांतील सीसीटीव्ही फुटेजचे कसून विश्लेषण केल्यानंतर पोलिसांना संशयितांची माहिती मिळाली. पोलिसांनी महेंद्र चव्हाण आणि मुकेश चव्हाण या दोघांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी वाहन चोरीची कबुली दिली.यानंतर पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या. या सर्व दुचाकींची एकूण किंमत सुमारे १ लाख ८७ हजार रुपये असल्याचे सांगण्यात आले. पोलिसांकडून आरोपींची अधिक चौकशी सुरू असून, आणखी काही चोरीच्या घटनांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर