
नंदुरबार, 22 मे (हिं.स.) मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 नुसार ग्रुप ग्रामपंचायत कन्साई (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील लोकनियुक्त सरपंच श्रीमती पावरा सविता सांबरसिंग यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या अविश्वास प्रस्तावाची पडताळणी करण्यासाठी गुरुवार, दिनांक 28 मे 2026 रोजी सकाळी ठीक 11-00 वाजता जिल्हा परिषद मराठी शाळा, कन्साई येथे विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपविभागीय अधिकारी शहादा भाग शहादा नामदेव पाटील यांनी कळविली आहे. सरपंच श्रीमती सविता पावरा यांच्याविरुद्ध 7 मे 2026 रोजी अविश्वास प्रस्तावाची नोटीस देण्यात आली होती. त्यानंतर 13 मे 2026 रोजी झालेल्या बैठकीत तीन-चतुर्थांश बहुमताने हा प्रस्ताव संमत करण्यात
आला. या संमत झालेल्या प्रस्तावाची कायदेशीर पडताळणी करण्यासाठी ही विशेष ग्रामसभा बोलावण्यात आली आहे.
विशेष ग्रामसभेची रूपरेषा:
वेळेचे कडक बंधन: विशेष ग्रामसभा सकाळी ठीक 11.00 वाजता सुरू होईल. सर्व ग्रामपंचायत
सदस्य आणि ग्रामस्थांनी 11-00 वाजेपूर्वीच सभास्थानी प्रवेश करणे अनिवार्य आहे सकाळी 11-
00 वाजेनंतर कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
गणपूर्ती आवश्यक: प्रचलित नियमांनुसार सभेसाठी आवश्यक असलेली गणपूर्ती (कोरम) पूर्ण असणे
गरजेचे राहील.
मतदानाचा अधिकार: मतदार यादीत नाव असलेल्या सर्व सदस्यांना आणि ग्रामस्थांना या सभेत
मतदानाचा अधिकार असेल हे मतदान शिरगणना पद्धतीने (हात उंचावून किंवा डोकी मोजून)
घेतले जाईल.
केवळ अविश्वास प्रस्तावावरच चर्चा: ही विशेष ग्रामसभा फक्त अविश्वास ठरावावर चर्चा व निर्णय
घेण्यासाठी आयोजित केली असल्याने, त्या दिवशी इतर कोणत्याही विषयांवर चर्चा होणार नाही.
साध्या बहुमताने होणार फैसला: उपस्थित राहून शिरगणना पद्धतीने मतदान करणाऱ्या ग्रामसभा
सदस्यांच्या साध्या बहुमतानेअविश्वास ठराव मंजूर झाल्यास सरपंच पदमुक्त होतील. मात्र, हा ठराव साध्या बहुमताने फेटाळला गेल्यास सरपंचांचे पद कायम राहील.
---------------
हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर