
सोलापूर, 22 मे (हिं.स.) : मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ई-केवायसीबाबत सोशल मीडियावर पसरलेल्या अफवांमुळे सोलापुरात महिलांची मोठी गर्दी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. यामुळे महिला व बाल विकास कार्यालयात मोठा गोंधळ निर्माण झाला.
सात रस्ता परिसरातील कार्यालयात लाभार्थी महिलांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. याच दरम्यान काही झेरॉक्स केंद्रांवर 3 रुपयांचा ई-केवायसी फॉर्म तब्बल 25 रुपयांना विकला जात असल्याचेही निदर्शनास आले.
प्रत्यक्षात कार्यालयाकडून दोन पोर्टल सुरू असून लाभार्थ्यांचे ई-केवायसी पूर्ण झाले आहे का याची पडताळणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवून गर्दी करू नये, असे आवाहन प्रशासन व संभाजी ब्रिगेडकडून करण्यात आले.
दरम्यान, महिला व बाल कल्याण कार्यालय सात रस्ता परिसरातील खासगी इमारतीत भाडेतत्त्वावर कार्यरत असल्याने नागरिकांची गैरसोय होत असल्याचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला. हे कार्यालय जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयात स्थलांतरित करावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्याचे ठरवले आहे.
या प्रकरणी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अनिल कदम, जिल्हाध्यक्ष संभाजीराजे भोसले, महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मीनल दास आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
--------------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड