नीटचा पेपर फुटूनही शिक्षणमंत्री पदावर कसे?; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा - वडेट्टीवार
नागपूर, 22 मे (हिं.स.)। देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी
नीटचा पेपर फुटूनही शिक्षणमंत्री पदावर कसे?; धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा - वडेट्टीवार


नागपूर, 22 मे (हिं.स.)। देशात गेल्या दहा वर्षांत अनेक पेपर फुटले त्यातही नीट सारख्या परीक्षांचे पेपर फुटत असतील आणि सिस्टममधील लोकच त्यात सामील असतील, तर याला सर्वस्वी केंद्र सरकार जबाबदार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना थोडी जरी लाज आणि नैतिकता असती, तर त्यांनी आतापर्यंत आपल्या पदाचा राजीनामा दिला असता अशी घणाघाती टीका काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आज नागपूर इथे केली.लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही हीच मागणी केली असून, या संवेदनशील पदावर बसलेल्या मंत्र्यांना विद्यार्थ्यांच्या भविष्याची कोणतीही काळजी नसल्याचे यातून सिद्ध होत असल्याचे ते म्हणाले. या प्रकरणात मोटेगावकर किंवा अमित देशमुख यांच्या जुन्या विधानाचा आधार घेऊन सरकार स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत असल्याची टीका ही वडेट्टीवार यांनी केली.

महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली असून सरकार त्यांना जाणीवपूर्वक उद्ध्वस्त करत असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी दोनदा कर्जमाफीची घोषणा केली, मात्र अद्याप कोणताही स्पष्ट शासन निर्णय निघालेला नाही.

राज्यात डिझेल-पेट्रोलचा निर्माण झालेला तुटवडा आणि आगामी काळात केवळ २५% खते उपलब्ध होतील, असे केंद्रीय मंत्र्यांचे सांगणे चिंताजनक आहे. डिझेलअभावी शेतीची मशागत आणि नांगरणी कशी होणार? असा सवाल वडेट्टीवार यांनी उपस्थित केला.

सिस्टमविरोधात संताप व्यक्त करणाऱ्या तरुणांचे X (ट्विटर) हँडल्स बंद करून सरकार आपली भीती लपवत आहे. तरुणांना हिंदू-मुस्लिम किंवा भारत-पाकिस्तानच्या मुद्द्यांपेक्षा रोजगार हवा आहे.पण सर्वोच्च पदावर बसलेली व्यक्ती जेव्हा तरुणांना कॉकरोच म्हणते, तेव्हा तरुणांच्या मनातील राग उफाळून येणे स्वाभाविक आहे. सरकारचा एकूण कारभार हा पूर्णपणे तरुण विरोधी असून तो राग आता व्यक्त होत आहे अस वडेट्टीवार म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande