
पुणे, 22 मे (हिं.स.)।
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या तसेच पूर्वीपासून महापालिका क्षेत्रात असलेल्या काही गावांमध्ये स्मशानभूमींमध्ये गॅसदाहिनी उभारण्यास स्थानिक ग्रामस्थांकडून विरोध होत आहे. त्यामुळे आवश्यक साहित्य उपलब्ध असूनही दोन ठिकाणी गॅसदाहिनी उभारणीची कामे रखडली आहेत.महापालिकेत गावांचा समावेश झाल्यानंतर या भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले असून निवासी इमारतींची संख्या वाढली आहे. मात्र, संबंधित परिसरांतील स्मशानभूमींमध्ये आधुनिक दहन सुविधा नसल्याने नागरिकांना अंत्यसंस्कारासाठी पार्थिववैकुंठ स्मशानभूमी येथे आणावे लागत आहे.यामुळे वैकुंठ स्मशानभूमीवरील ताण सातत्याने वाढत असल्याचे दिसून येत आहे. महापालिकेच्या 15 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत सध्या 29 स्मशानभूमी असून त्यापैकी 27 ठिकाणी गॅसदाहिन्या कार्यरत आहेत. तरीदेखील शहरातील सुमारे 60 टक्के अंत्यसंस्कार वैकुंठ स्मशानभूमीतच होत असल्याची माहिती समोर आली आहे.अंत्यसंस्कार व्यवस्थेचे विकेंद्रीकरण करण्यासाठी उपनगर आणि समाविष्ट गावांमधील स्मशानभूमींमध्ये आधुनिक सुविधा उभारण्याचा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्याअंतर्गत विद्युतदाहिनी आणि गॅसदाहिनी बसविण्याचे नियोजन करण्यात आले आहे.मात्र, स्थानिक स्तरावर होत असलेल्या विरोधामुळे या योजनांच्या अंमलबजावणीत अडथळे निर्माण होत असून प्रशासनासमोर मोठे आव्हान उभे राहिले आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु