
सोलापूर, 22 मे (हिं.स.)। पंढरपूर’ शहरातील रस्ते धुळमुक्त आणि स्वच्छ ठेवण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. गेल्या 5 ते 7 वर्षांपासून बंद अवस्थेत असलेली नगरपरिषदेची ‘रोड स्विपर मशीन’ अखेर दुरुस्त करण्यात आली असून ती पुन्हा नागरिकांच्या सेवेत दाखल झाली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे पूजन करून या आधुनिक रस्ते स्वच्छता यंत्रणेचा शुभारंभ करण्यात आला. अनेक वर्षांपासून शहरातील नागरिक तसेच बाहेरून येणारे भाविक आणि प्रवासी रस्त्यांवरील उडणाऱ्या धुळीमुळे त्रस्त होते. या समस्येची दखल घेत शहर अधिक स्वच्छ आणि धुळमुक्त करण्याचा संकल्प नगरपरिषदेकडून करण्यात आला होता.
‘स्वच्छ पंढरपूर, सुंदर पंढरपूर’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या कार्यक्रमाला नगरसेवक सुधीर धोत्रे, संजय बंदपट्टे, आदित्य फत्तेपूरकर, किरण घाडगे, प्रसाद भैय्या कळसे, अक्षय गंगेकर, लोकेश यादव, विनायक देवमारे, सुधीर भोसले, भीमराव आप्पा माळी, मुहम्मद उस्ताद, मनमोहन अभंगराव, बापू चौधरी, बंडू डोईफोडे, विशाल आर्वे यांच्यासह नगरपरिषदेच्या स्वच्छता आणि आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड