बच्चू कडूंवर उद्धव ठाकरेंची पहिलीच थेट टीका; “घरी बोलावून मंत्री केला, ही माझी चूक”
मुंबई, 22 मे (हिं.स.)। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी मिळवलेले बच्चू कडू यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे टीका केली आहे. “घरी बोलावून त्याला मंत्री केला, ही माझी चूक झाली. जे लोभ
uddhav thackeray slams bachchu kadu joins eknath shinde shivsena party


मुंबई, 22 मे (हिं.स.)। प्रहार जनशक्ती पक्षाचे प्रमुख आणि नुकतेच शिवसेनेत प्रवेश करून विधान परिषदेची आमदारकी मिळवलेले बच्चू कडू यांच्यावर उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदाच जाहीरपणे टीका केली आहे. “घरी बोलावून त्याला मंत्री केला, ही माझी चूक झाली. जे लोभापायी गेलेत त्यांना जाऊ द्या,” अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी बच्चू कडूंवर निशाणा साधला. सोलापूर, परभणी आणि धाराशिव जिल्ह्यातील प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

काही दिवसांपूर्वी बच्चू कडू यांनी त्यांचा प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करत विधान परिषदेची आमदारकी स्वीकारली होती. त्यानंतर मराठवाड्यातील प्रहार संघटनेतील अनेक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाली. या नाराज कार्यकर्त्यांनी मुंबईतील मातोश्री येथे उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे तसेच हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर उपस्थित होते.

प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांनी बच्चू कडूंवर गंभीर आरोप करताना सांगितले की, “बच्चू कडू यांनी आम्हाला विकून टाकले आणि मिंधे सेनेत प्रवेश केला. आम्ही स्वाभिमानी आहोत, त्यामुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे आम्ही कायम ठाकरेंसोबत राहणार आहोत.”

यावेळी उद्धव ठाकरे यांनीही बच्चू कडूंना लक्ष्य केले. “आपल्यातून जो गेला तो जुना शिवसैनिकच होता. त्याला घरी बोलावून मंत्री केले, ही माझी चूक होती. पण कार्यकर्ते अजूनही माझ्यासोबत आहेत, याचा मला आनंद आहे,” असे ठाकरे म्हणाले.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बच्चू कडू हे प्रहार पक्षाचे एकमेव आमदार होते. त्या वेळी त्यांना राज्यमंत्रिपद देण्यात आले होते. मात्र, एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर बच्चू कडू हे शिंदे गटासोबत गुवाहाटीला गेले होते. त्यानंतर त्यांनी प्रहार पक्ष शिवसेनेत विलीन करत विधान परिषदेवर आमदारकी स्वीकारली.

दरम्यान, बच्चू कडू यांनी यापूर्वी आपण कोणत्याही पदासाठी शिवसेनेत गेलो नसल्याचे स्पष्ट केले होते. “मला काही मागायचे असते तर गुवाहाटीला गेलो तेव्हाच मागितले असते. मी पदासाठी नव्हे, तर दिव्यांग मंत्रालयासाठी भांडलो,” असेही बच्चू कडू यांनी म्हटले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande