पावसाळा आणि पालखी सोहळ्याच्या तयारीवर आचारसंहितेचे सावट
पुणे, 22 मे (हिं.स.)। विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. पुढील दीड महिन्यांच्या कालावधीत कोणतेही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने महा
Alandi wari


पुणे, 22 मे (हिं.स.)।

विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने प्रशासकीय कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. पुढील दीड महिन्यांच्या कालावधीत कोणतेही आर्थिक किंवा धोरणात्मक निर्णय घेता येणार नसल्याने महापालिकेचा कारभार ठप्प झाल्याची स्थिती निर्माण झाली आहे.यासंदर्भात तोडगा काढण्यासाठी महापालिकेने जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्याकडे मार्गदर्शन मागितले आहे. नगरसचिव योगिता भोसले यांनी याबाबतचे पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविले आहे.महापालिकेची निवडणूक होऊन अवघे साडेचार महिने झाले असताना नगरसेवकांनी विकासकामांना गती देण्यास सुरुवात केली होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने स्थायी समिती, सर्वसाधारण सभा तसेच विविध विशेष समित्यांचे कामकाज थांबले आहे. त्यामुळे प्रशासनातील निर्णयप्रक्रियेलाही मोठा फटका बसला आहे.दरम्यान, पावसाळा काही आठवड्यांवर येऊन ठेपला असून पावसाळ्यापूर्वीची कामे, रस्ते दुरुस्ती, नालेसफाई आणि आपत्कालीन उपाययोजनांसाठी तातडीचे निर्णय आवश्यक आहेत. मुसळधार पावसाच्या परिस्थितीत आणीबाणीचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते, अशीही चिंता व्यक्त होत आहे.पावसाळा अवघ्या काही आठवड्यांवर आला आहे, त्यामुळे पावसाळ्यापूर्वीची कामे करणे, त्यासाठी धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहेत. जास्त पाऊस झाल्यास आणीबाणीच्या स्थितीत तातडीचे निर्णय घ्यावे लागतात. त्याच प्रमाणे पुण्यात जुलै महिन्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे आगमन होणार आहे. या सोहळ्याच्या तयारीसाठी पाणीपुरवठा, रस्त्यांवरील खड्डे, आरोग्य सेवा, निवास व्यवस्था यासह अन्य महत्त्वाची कामे करावी लागतात. त्यामुळे अशा तातडीच्या विषयांवर निर्णय घेण्यासाठी स्थायी समितीची परवानगी मिळावी, अशी विनंती प्रशासनाने केली आहे. त्यावर आता जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात याकडे लक्ष लागले आहे

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande