अमरावतीत 11 केव्हीच्या पोलवर करंट लागून युवकाचा मृत्यू
अमरावती, 23 मे (हिं.स.) शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने विद्युत लाईन दुरुस्त करण्यासाठी 11 केव्हीच्या पोलवर चढलेल्या 24 वर्षीय युवकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सावंगी संगम परिसरात शुक्रवारी
11 केव्हीच्या पोलवर करंट लागून 24 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू


अमरावती, 23 मे (हिं.स.)

शेतातील मंदिराच्या बांधकामासाठी पाणी सुरू व्हावे, या उद्देशाने विद्युत लाईन दुरुस्त करण्यासाठी 11 केव्हीच्या पोलवर चढलेल्या 24 वर्षीय युवकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना सावंगी संगम परिसरात शुक्रवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.

मृत युवकाचे नाव अंकुश श्रावणजी नेवारे (वय 24, रा. सावंगी संगम) असे आहे. अंकुश हा डीजे व्यवसायासोबतच विद्युत संबंधित छोटी-मोठी कामे करीत होता. त्याच्या कुटुंबाची हडपा शिवारात सुमारे दोन एकर शेती असून, शेतातील वीजपुरवठा बंद असल्याने तो लाईन सुरू करण्यासाठी प्रयत्न करीत होता. माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजताच्या सुमारास अंकुश शेताजवळील 11 केव्ही विद्युत पोलवर चढून जंपर बदलण्याचे काम करीत होता. संबंधित लाईन दररोज सायंकाळी चार वाजता बंद होऊन सहा वाजता सुरू होते, असा त्याचा समज होता. मात्र अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने त्याला जोरदार करंट लागला आणि तो पोलवरच लटकलेल्या अवस्थेत मृत झाला.घटनेची माहिती मिळताच गावकरी घटनास्थळी धावले. ग्रामस्थांच्या मदतीने अंकुशला पोलवरून खाली उतरवण्यात आले. याबाबतची माहिती चांदूर रेल्वे पोलिसांना देण्यात आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, चांदूर रेल्वे येथे आणण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. गावकऱ्यांच्या माहितीनुसार, अंकुशच्या शेतात मंदिर बांधकाम सुरू होते. बांधकामासाठी पाण्याची गरज असल्याने बंद पडलेली लाईन सुरू करण्याचा तो प्रयत्न करीत होता. मात्र नियतीने घात केला आणि एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला. अंकुशच्या पश्चात आई-वडील व भाऊ असा परिवार असून, या घटनेमुळे सावंगी संगम गावावर शोककळा पसरली आहे. मृतकाच्या कुटुंबाला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande