कॉक्रोच जनता पार्टीचे संकेतस्थळही बंद; अभिजीत दिपकेंची केंद्र सरकारवर टीका
नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमे आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले असून त्यामुळे पक्
Cockroach Janata Party Website Also Shut Down


नवी दिल्ली, 23 मे (हिं.स.)। गेल्या काही दिवसांपासून सामाजिक माध्यमे आणि राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरलेल्या अभिजीत दिपके यांच्या कॉक्रोच जनता पार्टीवर आणखी एक मोठी कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे अधिकृत संकेतस्थळ बंद करण्यात आले असून त्यामुळे पक्षाच्या डिजिटल मोहिमेला मोठा धक्का बसला आहे. या संकेतस्थळाच्या माध्यमातून नागरिकांना कॉक्रोच जनता पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी नोंदणी करता येत होती. मात्र आता हे संकेतस्थळ पूर्णपणे बंद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

संकेतस्थळ बंद झाल्यानंतर अभिजीत दिपके यांनी केंद्र सरकारवर थेट टीका केली. त्यांनी सांगितले की, या संकेतस्थळावर सुमारे दहा लाख लोकांनी नोंदणी केली होती. त्यापैकी सहा लाख लोकांनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. सरकारला झुरळांची इतकी भीती का वाटते? पण सरकारचे हे हुकूमशाही वर्तन भारतातील तरुणांचे डोळे उघडत आहे. आमचा एकमेव गुन्हा हाच आहे की, आम्ही स्वतःसाठी एका चांगल्या भविष्याची मागणी करत होतो. पण तुम्ही आमची इतक्या सहजपणे सुटका करून घेऊ शकत नाही. सध्या आम्ही आमच्या एका नव्या घराच्या उभारणीवर काम करत आहोत. झुरळे कधीच मरत नाहीत.अशी तीव्र प्रतिक्रिया अभिजीत दिपके यांनी दिली.

याआधी दोन ते तीन दिवसांत कॉक्रोच जनता पार्टीची एक्सवरील अधिकृत खाती आणि त्यानंतर इन्स्टाग्राम खातेही बंद करण्यात आले होते. या दोन्ही सामाजिक माध्यमांवर पक्षाला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला होता. लाखो तरुण आणि समर्थक या पानांशी जोडले गेले होते. त्यामुळे अचानक ही सर्व खाती आणि आता संकेतस्थळ बंद झाल्याने पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, इन्स्टाग्राम आणि एक्स खाती बंद झाल्यानंतर काही समर्थकांनी आंदोलन आणि निदर्शनांचा इशारा दिला होता. मात्र अभिजीत दिपके यांनी स्वतः पुढे येत समर्थकांना संयम राखण्याचे आवाहन केले. घाईघाईने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये, अन्यथा संपूर्ण चळवळीवर परिणाम होऊ शकतो, असे त्यांनी स्पष्ट केले. सरकारला आपण चूक करावी असे वाटत आहे, त्यामुळे शांतता राखणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले. ही मोठी लढाई असून काळजीपूर्वक पुढे जावे लागेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.

अभिजीत दिपके आणि कॉक्रोच जनता पार्टीबाबत लोकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाल्याने त्यांच्या घराजवळ कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलीस संरक्षण देण्यात आले आहे. पोलीस उपायुक्त पंकज अंतुलकर यांनी याबाबत माहिती देताना पुढील काही दिवस सुरक्षा कायम ठेवली जाईल, असे सांगितले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande