
अमरावती, 23 मे (हिं.स.) : विधान परिषदेच्या अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी येत्या १८ जून रोजी जिल्ह्यातील सात केंद्रांवर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी उपविभागीय अधिकारी स्तरावर मतदान केंद्रांची तयारी करण्यात आली असून प्रशासनाने आवश्यक यंत्रणा सज्ज ठेवली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि महापालिकेतील एकूण ४५३ मतदार मतदानासाठी पात्र ठरले आहेत. यामध्ये २२६ महिला आणि २२७ पुरुष मतदारांचा समावेश आहे. जिल्हा परिषद व पंचायत समित्या अस्तित्वात नसल्यामुळे त्या संस्थांचे मतदार या निवडणुकीत सहभागी होणार नाहीत.
अमरावती महापालिका क्षेत्रात सर्वाधिक ९५ मतदार असून ते अमरावती उपविभागात मतदान करणार आहेत. तर धारणी नगरपंचायत आणि चिखलदरा नगरपरिषदेतील एकूण ४३ मतदार धारणी येथे मतदानाचा हक्क बजावतील.
याशिवाय अचलपूर उपविभागात चांदूर बाजार आणि अचलपूर नगरपालिकांचे मतदार, मोर्शी उपविभागात मोर्शी, वरूड आणि शेंदुरजनाघाट नगरपालिकांचे एकूण ८१ मतदार मतदान करतील. दर्यापूर उपविभागात अंजनगाव सुर्जी आणि दर्यापूर नगरपालिकांचे ६१ मतदार मतदान प्रक्रियेत सहभागी होणार आहेत.
चांदूर रेल्वे उपविभागात धामणगाव रेल्वे, चांदूर रेल्वे नगरपालिका आणि नांदगाव खंडेश्वर नगरपंचायतीचे ६६ मतदार मतदान करतील. तिवसा आणि भातकुली येथे मिळून ३८ मतदार आहेत.
निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी सात उपविभागीय अधिकारी आणि १४ तहसीलदार यांच्या नियंत्रणाखाली व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर सहा पोलिस कर्मचाऱ्यांसह एकूण ४२ कर्मचारी नियुक्त करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रासाठी स्वतंत्र वाहनाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
-----------------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी