अमरावती - तळेगाव ठाकूर येथे भुईमुंग काढणीला सुरुवात वाढत्या खर्चामुळे लागवडीत घट
अमरावती, 23 मे (हिं.स.) परिसरात भुईमूग काढणीच्या कामाला सध्या वेग आला असून शेतशिवारात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणीचे काम सुरू आहे. भुईमूग पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. यंदा मौजा विंचोरी येथील शेतकरी दादाराव
तळेगाव ठाकूर येथे भुईमुंग काढणीला सुरुवात  वाढत्या खर्चामुळे लागवड मध्ये घट..


अमरावती, 23 मे (हिं.स.)

परिसरात भुईमूग काढणीच्या कामाला सध्या वेग आला असून शेतशिवारात पहाटेपासून संध्याकाळपर्यंत काढणीचे काम सुरू आहे. भुईमूग पिकाला पेरणीपासून काढणीपर्यंत साधारण चार महिन्यांचा कालावधी लागतो. यंदा मौजा विंचोरी येथील शेतकरी दादाराव घोरमाडे यांनी उमेश उमप यांच्या शेतात भुईमूगाची लागवड केली होती.

या पिकासाठी बियाण्यावर सुमारे १८ हजार रुपये खर्च आला. त्यानंतर फवारणीसाठी ५ हजार, खतांसाठी ६ हजार, काढणीसाठी २० हजार असा खर्च झाला. तसेच शेत तयार करण्याचा व इतर पूरक खर्चही मोठ्या प्रमाणात झाला. एकूण उत्पादनाचा हिशोब करता ५ बॅग बियाण्यातून सुमारे ८ क्विंटल उत्पन्न मिळत असून बाजारात भुईमूगाला सध्या अंदाजे ७ हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळत आहे.

पूर्वी तळेगाव ठाकूर परिसरात मोठ्या प्रमाणात भुईमूग लागवड केली जात होती. मात्र वाढता खर्च, मजुरांची टंचाई, वन्य प्राण्यांकडून होणारे नुकसान आणि बाजारभावातील अनिश्चितता यामुळे या पिकाची लागवड हळूहळू कमी होत चालली आहे.दरम्यान, काढणीच्या काळात मजूर वर्गाला मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागते. पहाटेपासून ते संध्याकाळपर्यंत ४५ ते ४६ अंश सेल्सिअस तापमानात भुईमूग उपटणे व शेंगा तोडण्याचे काम करावे लागते. अनेक वेळा मजुरांसोबत त्यांच्या कुटुंबातील महिला व लहान मुलेही या कामात सहभागी होताना दिसतात.

शेतकऱ्याची प्रतिक्रिया “भुईमूग पिकात खर्च खूप वाढला आहे, पण त्यानुसार बाजारभाव मिळत नाही. मजूर मिळणे अवघड झाले आहे आणि वन्य प्राण्यांमुळेही नुकसान होते. एवढ्या कष्टानंतरही हातात फारसा नफा राहत नाही. त्यामुळे अनेक शेतकरी भुईमूग लागवडीपासून दूर जात आहेत,” अशी प्रतिक्रिया तळेगाव ठाकूर येथील शेतकरी दादाराव घोरमाडे यांनी व्यक्त केली.---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande