
अमरावती, 23 मे (हिं.स.)
महिलांना राजकारणात संधी मिळावी म्हणून शासनाने ग्रामपंचायतींमध्ये ५० टक्के आरक्षण दिले असले, तरी अनेक ठिकाणी निवडून आलेल्या काही महिला सदस्यांच्या जागी त्यांच्या पतींचाच कारभार सुरू असल्याची कुजबूज आहे. आता ग्रामपंचायतींमध्ये प्रशासकीय काळ सुरू असतानाही अनेक ठिकाणी पतीदेवच कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याची चर्चा गावखेड्यात आहे. अचलपूर तालुक्यासह जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये काही महिला सदस्यांना केवळ सभांपुरते मर्यादित ठेवल्या जात असल्याचे बोलल्या जात आहे. विकासकामांपासून कार्यालयीन निर्णयांपर्यंत सर्व व्यवहार त्यांच्या पतींकडूनच हाताळले जात असल्याने काही महिला लोकप्रतिनिधींना प्रत्यक्ष काम करण्याची संधी मिळत नसल्याची ओरड आहे. दरम्यान, शासनाने याबाबत परिपत्रक काढून पदाधिकाऱ्यांच्या नातेवाइकांनी ग्रामपंचायत कार्यालयीन कामकाजात हस्तक्षेप करू नये, तसेच कार्यालयात बसू नये, असे स्पष्ट आदेश दिले आहेत. आदेशांचे उल्लंघन झाल्यास संबंधित पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची तरतूदही करण्यात आली आहे. मात्र, स्थानिक स्तरावर या आदेशांकडे दुर्लक्ष होत असल्याने पतीदेवांचा हस्तक्षेप कायम असल्याचे चित्र आहे.
महिला प्रशासक सदस्यांऐवजी त्यांच्या पतीदेवांना शासकीय कामात हस्तक्षेप करता येत नाही. जर त्यांचे पतीदेव शासकीय कामात हस्तक्षेप करीत असतील व तशाप्रकारची आमच्या कार्यालयात तक्रार आली तर आमच्याकडून शासनाच्या जीआरमध्ये असलेल्या तरतुदीनुसार निश्चितच कारवाई करण्यात येईल. -विनोद खेडकर, प्रभारी गटविकास अधिकारी, पंचायत समिती, अचलपूर.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी