मान्सूनच्या प्रगतीला वेग; राज्यातही लवकर आगमनाची शक्यता
मुंबई, 23 मे (हिं.स.)। राज्यातील भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, २३ मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र,
Monsoon Progress Accelerates Early Arrival Likely MH


Monsoon


मुंबई, 23 मे (हिं.स.)। राज्यातील भीषण उकाडा आणि वाढत्या तापमानामुळे त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार, २३ मे रोजी नैऋत्य मान्सूनने नैऋत्य अरबी समुद्र, आग्नेय अरबी समुद्र, कोमोरिन परिसर तसेच बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांत यशस्वी प्रगती केली आहे. त्यामुळे देशभरातील वातावरणात मोठा बदल होण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील तीन ते चार दिवस मान्सूनच्या प्रवासासाठी अत्यंत अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे मान्सून आणखी वेगाने पुढे सरकण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आगामी काही दिवसांत नैऋत्य आणि आग्नेय अरबी समुद्राचा आणखी मोठा भाग, कोमोरिन क्षेत्र, बंगालच्या उपसागरातील विस्तृत परिसर तसेच उर्वरित अंदमान समुद्र मान्सूनच्या प्रभावाखाली येण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

यंदा मान्सून केरळात नेहमीपेक्षा लवकर दाखल होण्याची शक्यता असून १ जूनऐवजी २६ मे रोजीच तो केरळ किनारपट्टीवर पोहोचू शकतो. बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मान्सूनचा वेग वाढला आहे. विशेष म्हणजे, यंदा मान्सूनच्या सुरुवातीच्या टप्प्यात बंगालच्या उपसागरात किंवा अरबी समुद्रात कोणतेही चक्रीवादळ निर्माण झालेले नाही. त्यामुळे मान्सूनच्या वाटचालीत कोणताही मोठा अडथळा येणार नसून तो सुरळीतपणे पुढे सरकणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

मान्सूनचा प्रवास असाच वेगाने सुरू राहिल्यास ५ जूनपर्यंत तो गोव्यात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यानंतर ६ जूनला कोकणात आणि ७ जूनला पुण्यात मान्सून पोहोचू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रात मान्सून नेमका कधी दाखल होणार याकडे शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, विदर्भात उष्णतेचा कहर कायम असून ब्रह्मपुरी हे देशातील सर्वाधिक तापलेले शहर ठरले आहे. शनिवारी ब्रह्मपुरी येथे तब्बल ४७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. पुढील दोन दिवस विदर्भात उष्णतेची लाट कायम राहण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. संभाव्य तीव्र उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande