
पुणे, 23 मे (हिं.स.) - पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेकडून आषाढीवारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग आला असून महापालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी पालखी मार्ग, मुक्काम व विसावा स्थळांची प्रत्यक्ष पाहणी केली. वारकऱ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करत आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश त्यांनी दिले.दरवर्षीप्रमाणे यंदाही संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे उत्साहात स्वागत करण्यात येणार आहे.
तुकाराम महाराज पालखीचे स्वागत निगडीतील भक्ती शक्ती चौकात होणार असून त्यानंतर आकुर्डी येथे पालखीचा मुक्काम असेल. या दोन्ही ठिकाणांसह पालखी मार्गाची आयुक्तांनी पाहणी केली.ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे स्वागत मोशी येथील मॅगझीन चौकात करण्यात येणार असून त्या ठिकाणाचाही आढावा घेण्यात आला. तसेच थोरल्या पादुका मंदिरासह विविध विसावा स्थळांवर देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेण्यात आली.आकुर्डी येथील मौलाना अबुल कलाम आजाद उर्दू माध्यमिक विद्यालय येथे दिंड्यांचा मुक्काम होणार आहे. या ठिकाणी पाणी, स्वच्छता, आरोग्य व सुरक्षा व्यवस्थेचा आढावा आयुक्तांनी घेतला. याशिवाय खराळवाडी येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, नाशिक फाटा रोड, दापोडी येथील पालखी विसावा स्थळांचीही पाहणी करण्यात आली.या दौऱ्यात अतिरिक्त आयुक्त कुलदीप जंगम, विक्रांत बगाडे, विशेष अधिकारी किरण गायकवाड, पोलीस अधिकारी तसेच महापालिकेचे विविध विभागप्रमुख उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु