पुणे - वादळी वाऱ्यामुळे शहरात ११ ठिकाणी झाडे कोसळली; वाहनांचे नुकसान
पुणे, 23 मे (हिं.स.)। पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दुपारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. गेल्या काही दिवसांपासून शहरात
evm


पुणे, 23 मे (हिं.स.)।

पिंपरी-चिंचवड शहरात शुक्रवारी दुपारी मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे तासभर सुरू असलेल्या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.

गेल्या काही दिवसांपासून शहरात कडक उन्हामुळे तापमान वाढले होते. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असल्याने उकाड्यात अधिक भर पडली होती. दुपारनंतर अचानक वातावरणात बदल झाला आणि सुमारे चारच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली.

पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, निगडी, भोसरी, मोशी, सांगवी, वाकड, थेरगाव आणि पिंपळे सौदागर परिसरात मुसळधार पाऊस झाला. अनेक सखल भागात पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली. पुणे-मुंबई महामार्गावर पिंपरी ते निगडीदरम्यान सुरू असलेल्या महामेट्रोच्या कामामुळे सेवा रस्त्यांवर खड्डे निर्माण झाले आहेत. पावसाचे पाणी या खड्ड्यांमध्ये साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. चिंचवड स्टेशन, आकुर्डी आणि निगडी पुलाखाली पाणी साचल्याने वाहतूक कोंडीतही वाढ झाली.

दरम्यान, भोसरीतील गव्हाणे परिसरात एका नारळाच्या झाडावर वीज कोसळून आग लागल्याची घटना घडली. अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. तसेच रुपीनगर परिसरात उच्चदाब वीजवाहिनीची तार जमिनीच्या जवळ लोंबकळत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

वादळी वाऱ्याचा तडाखाही शहराला बसला असून विविध भागांत झाडे कोसळण्याच्या ११ घटना नोंदवण्यात आल्या. वाल्हेकरवाडीत एका कारवर झाड कोसळून नुकसान झाले. मोशी, दापोडी, चोवीसावाडी, संभाजीनगर, बर्ड व्हॅली, सेक्टर २६, रुपीनगर, आकुर्डी रेल्वे स्थानक, रावेत आणि मारुंजी परिसरातही झाडे पडल्याची माहिती मुख्य अग्निशमन अधिकारी व्यंकटेश दुर्वांस यांनी दिली.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande