1100 महिलांना कौशल्य प्रशिक्षण; रहमान फाउंडेशनचा उपक्रम गाजला
रायगड, 23 मे (हिं.स.) रहमान फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला भव्य गौरव सोहळा नुकताच नेरळ येथील खानकाह-ए-नोमानीया, ममदापुर येथे उत्साहात संपन्न झाला. मुंबई, कर्जत व नेरळ परिसरातील रहमान फाउंडेशनच्य
Skill training for 1100 women; Rahman Foundation's initiative gained popularity


Skill training for 1100 women; Rahman Foundation's initiative gained popularity


रायगड, 23 मे (हिं.स.) रहमान फाउंडेशनच्या वतीने महिला सक्षमीकरण व कौशल्य विकास उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आलेला भव्य गौरव सोहळा नुकताच नेरळ येथील खानकाह-ए-नोमानीया, ममदापुर येथे उत्साहात संपन्न झाला. मुंबई, कर्जत व नेरळ परिसरातील रहमान फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण केंद्रांमार्फत 1100 हून अधिक महिलांना विविध कौशल्य प्रशिक्षण देण्यात आले.

या उपक्रमांतर्गत महिलांना शिवणकला, विणकाम, एम्ब्रॉयडरी, शिवण मशीन ऑपरेशन तसेच विविध स्वयंरोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र, ट्रॉफी व प्रोत्साहनपर भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या महिलांना शिवण मशीनचे वितरण करण्यात आले.

या कार्यक्रमाला मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, सामाजिक कार्यकर्ते, पोलीस अधिकारी, वकील व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात बोलताना अॅडव्होकेट सुमित साबळे यांनी समाजामध्ये एकता, मानवता व संविधानिक मूल्ये जपण्याचे महत्त्व अधोरेखित केले. जात-धर्माच्या पलीकडे जाऊन समाजाने एकत्र येत महिला सक्षमीकरणासाठी कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

रहमान फाउंडेशनच्या महिला सक्षमीकरण केंद्राच्या प्रभारी अॅड. क्रांती आभांगे यांनी फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक करत महिलांसाठी अधिक प्रशिक्षण केंद्रे, शैक्षणिक संस्था व आरोग्य सुविधा निर्माण करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

फाउंडेशनचे पीआरओ माजिद भाई यांनी सांगितले की, रहमान फाउंडेशन हे जात व धर्मभेद न करता मानवतेच्या सेवेसाठी कार्य करत असून विशेषतः गरीब व वंचित घटकांच्या सक्षमीकरणासाठी संस्था कटिबद्ध आहे.

या प्रशिक्षणामुळे महिलांच्या आयुष्यात सकारात्मक बदल झाल्याच्या भावना अनेक लाभार्थींनी व्यक्त केल्या. आत्मविश्वास वाढून आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत झाल्याचे महिलांनी सांगितले.

समारोपावेळी मौलाना खलील-उर-रहमान सज्जाद नोमानी यांनी महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य व सामाजिक ऐक्य यासाठी रहमान फाउंडेशन सातत्याने कार्यरत राहील, असा विश्वास व्यक्त केला. समाजात प्रेम, बंधुभाव आणि संविधानिक मूल्ये टिकवणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमानंतर सामुदायिक भोजन व आनंदोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. उपस्थित नागरिकांनी रहमान फाउंडेशनच्या कार्याचे विशेष कौतुक केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande