
अमरावती, 23 मे (हिं.स.)।
कुष्ठरुग्णांच्या पुरर्वसनासाठी गेल्या ८० वर्षांपासून अहोरात्र परिश्रम घेणाऱ्या विदर्भ महारोगी सेवा मंडळाला (तपोवन) शासनाच्या निधीची प्रतीक्षा आहे. ८० वर्षे झालेल्या या संस्थेच्या इमारती, दवाखाने जीर्ण झाले असून येथील रुग्णांच्या पुनर्वसनासाठी १० कोटी रुपये देण्याचे आश्वासन शासनाने दिले होते, परंतु ते अद्याप पूर्ण झाले नसल्याने आहे त्या स्थितीत येथील कार्य सुरु ठेवण्याची वेळ आली आहे. श्रद्धेय बाबा आमटे यांच्या आनंदवनातील कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष बाब म्हणून १० कोटी रुपयाचा कॉपर्स फंड देण्यास मान्यता दिली. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्रिमंडळाचे तपोवनचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई यांनी जाहीर आभार व्यक्त केले आहेत.
तपोवन ही भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी संस्था असून तिची स्थापना १९४६ ला झाली आहे. ८० वर्षे झालेल्या या संस्थेच्या इमारती, दवाखाने जीर्ण झाले असून येथील रुग्णांच्या पुनर्वसनासाठी सुद्धा १० कोटी रुपये देण्यात यावे अशी मागणी करण्यात आली होती. त्याला आरोग्य मंत्री डॉ. आबीटकर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. तपोवन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुभाष गवई व आमदार सुलभाताई खोडके यांच्या सोबत मुंबईला बैठक बोलावून अकरा मागण्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली. त्यानंतर कार्यवाहीचे आश्वासन दिले होते. त्यानंतर विधानसभेच्या आश्वासन समितीने तपोवनच्या समस्यांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार अमरावती सहाय्यक संचालक (कुष्ठरोग ) यांनी २ डिसेंबर २०२५ रोजी संस्थेला प्रत्यक्ष भेट देवून संपुर्ण संस्थेची पाहणी करून असलेल्या अडचणी, जीर्ण असलेल्या वास्तू, रस्ते यांचा फोटोसह अहवाल शासनाला पाठविला होता. हा सर्व प्रवास होवून आता एक वर्षे होवून गेल्यानंतर देखील अद्यापही कुठलेही विशेष अनुदान तपोवनला प्राप्त झालेले नाही. त्यामुळे शासनाने आश्वासित केल्याप्रमाणे १० कोटी रुपये कुष्ठरुग्णांच्या पुनर्वसनासाठी कधी मिळणार, याची प्रतीक्षा आहे.
पद्मश्री डॉ. शिवाजीराव पटवर्धन यांच्या तपोवनमधील कुष्ठरुग्नांच्या पुनर्वसनासाठी विधानसभेमध्ये आरोग्यमंत्री प्रकाशजी आबीटकर यांनी आमदार सुलभाताई खोडके यांना आश्वासन दिले होते. त्यानुसार १० कोटी रुपयांचा विशेष निधी तपोवनला तात्काळ द्यावा, अशी आमची विनंती आहे. - डॉ. सुभाष गवई अध्यक्ष, तपोवन.
----------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी