
अमरावती, 23 मे (हिं.स.)।
राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत तालुक्यातील आमला विश्वेश्वर या गावात २०१९ मध्ये मंजूर करण्यात आलेली तब्बल एक कोटी ३९ लक्ष रुपयांची पाणीपुरवठा योजना प्रत्यक्षात ग्रामस्थांना पाणी देण्यात पूर्णतः अपयशी ठरली आहे. योजना पूर्ण झाल्याचा अधिकृत अहवाल असतानाही आजपर्यंत गावात पाणी पोहोचू शकले नसल्याची धक्कादायक स्थिती आहे. या योजनेचा गावाला कोणताही फायदा झाला नसून या संदर्भात गावातील नागरिकांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. मात्र याबद्दल कोणती दखल घेण्यात आली नाही. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी दुसरी तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती. यावेळी मात्र जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार चौकशी समिती नेमण्यात आली. चौकशी समितीने २६ डिसेंबर २०२६ रोजी आमला विश्वेश्वर गावाला भेट देऊन कागदाचा खेळ, बनवाबनवी व खोटारडेपणा करत दोषी अधिकारी, कर्मचारी, यांना वाचवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावातील तक्रारकर्ते प्रवीण बकाले व प्रदीप बनसोड यांनी केले आहे. कोणत्याही विभागापासून न्याय मिळत नसल्याचे पहात अखेर गावातील नागरिकांनी या संदर्भ मुख्यमंत्र्यांकडे आता लेखी तक्रार केली असून निष्पक्ष चौकशी करून दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी केली आहे.
अशी आहे मागणी
चौकशी कागदपत्राचे आधारे न करता प्रत्यक्ष जागेवर येऊन प्रत्येक बाबीची शहानिशा करून वापरलेल्या साहित्याची चाचणी करून निष्कर्ष काढावा. जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यामार्फत चौकशी करण्यात येऊ नये. महाराष्ट्र शासनाच्या पाणीपुरवठ्याची संबंधित तज्ञ अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली इस्टिमेट व मोजमाप पुस्तकाच्या अनुषंगाने चौकशी करण्यात यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी