
अमरावती, 23 मे (हिं.स.) - पिकविमा योजनेतील वगळण्यात आलेल्या चार ट्रीगरचा फटका शेतकऱ्यांना बसला असून कंपन्यांचे मात्र चांगभले झाले आहे. पीक कापणी प्रयोगाद्वारे उत्पादकता व तंत्रज्ञान आधारीत असे प्रत्येकी पन्नास टक्क्यांचे निकष लावण्यात आल्याने शेतकऱ्याना नुकसानीपेक्षाही कमी विमा परतावा मिळाला आहे. जिल्ह्यासाठी केवळ दोन कोटी ३० लाख रूपयांचा परतावा मंजूर झाला असून कंपनीला ११.२४ कोटी रूपयांचा प्रिमियम मिळाला. एक रूपयांत पिक विमा योजना बंद करून गतवर्षापासून नविन विमा योजना लागू करण्यात आली आहे. या नवीन योजनेत चार महत्वाचे ट्रीगर बाद करण्यात येऊन केवळ पिक कापणी प्रयोग व सॅटेलाईट बेस तंत्रज्ञानावर आधारीत उत्पादकतेची सरासरी काढण्याचे निकष लागू करण्यात आले. या निकषावरच पिक विमा परतावा मिळाला आहे. त्यामुळे पिक विमा योजनेत सहभागी शेतकऱ्याना नुकसान होऊनही परतावे मिळू शकले नाहीत व त्यांचे दुहेरी नुकसान झाले. गतवर्षीच्या खरीपात जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ५६० शेतकऱ्यांनी नवीन पीक विमा योजनेत सहभाग घेत ८.९० कोटी रूपये प्रिमियम जमा केला. राज्य शासनाने २.१२ कोटी व केंद्र शासनाने २.१२ कोटी प्रिमियम जमा केला आहे. जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी दोन कोटी ३० लाख रूपयांचा परतावा मंजूर करण्यात आला आहे. ९ हजार ३४२ शेतकऱ्यांना परतावे मिळाले. तर, योजनेतील सहभागी व प्रिमियम भरणाऱ्या एक लाख ७६ हजार २१८ शेतकऱ्यांना परतावे मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. गत हंगामातील पावसाळ्यात दहा तालुक्यात सरासरीपेक्षा जास्त पाऊस व ४२ मंडळातील अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान झाले. सरासरी उत्पादनात घट आली. मात्र तांत्रिक निकष लागू करण्यात आल्याने दहा तालुक्यातील शेतकऱ्याना परतावे नाकारण्यात आले. नवीन पिक विमा योजनेतील परताव्यांची स्थिती बघता ही योजना शेतकऱ्यांसाठी की कंपनीच्या भल्यासाठी हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. त्यामुळे आगामी हंगामात या योजनेत सहभागी शेतकऱ्यांची संख्या घटण्याची शक्यता वाढली आहे.
जिल्ह्यातील पिक विमा स्थिती सहभागी शेतकरी ः १, ८५, ५६० शेतकरी प्रिमियम ः ८.९० कोटी राज्य शासनाचे प्रिमियम ः २.१२ कोटी केंद्र शासनाचा प्रिमियम ः २.१२ कोटी परतावा मिळालेले शेतकरी ः ९, ३४२ एकूण परतावा मिळाला ः २.३० कोटी
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी