इबोलाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा नागरिकांना सल्ला; काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानचा प्रवास टाळा
नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। इबोला प्रभावित देशांतील बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण
Central Government Issues Advisory Citizens Regarding Ebola


नवी दिल्ली, 24 मे (हिं.स.)। इबोला प्रभावित देशांतील बदलती परिस्थिती आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (डब्ल्यूएचओ) शिफारशी लक्षात घेऊन केंद्र सरकारने सर्व भारतीय नागरिकांना पुढील सूचना मिळेपर्यंत काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदान येथे अनावश्यक प्रवास टाळण्याचा सल्ला दिला आहे. काँगो, युगांडा तसेच त्यांच्या सीमेला लागून असलेल्या दक्षिण सुदान आणि इतर देशांमध्ये हा आजार पसरण्याचा सर्वाधिक धोका असल्याचे सांगण्यात आले आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने हा सल्ला जारी केला आहे. या सल्ल्यानुसार, सध्या या देशांमध्ये वास्तव्यास असलेल्या किंवा प्रवास करणाऱ्या भारतीय नागरिकांनी स्थानिक प्रशासनाने जारी केलेल्या सार्वजनिक आरोग्यविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे आणि अतिरिक्त खबरदारी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे. डब्ल्यूएचओच्या आपत्कालीन समितीने २२ मे रोजी प्रवेशबिंदूंवरील रोगनियंत्रण आणि देखरेख अधिक मजबूत करण्यासाठी काही तात्पुरत्या शिफारशी जारी केल्या आहेत. या शिफारशींमध्ये ‘बुंडिबुग्यो विषाणू आढळलेल्या भागांमध्ये प्रवास टाळावा’ असा सल्लाही देण्यात आला आहे.

भारतात बुंडिबुग्यो विषाणू स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराचा अद्याप एकही रुग्ण आढळलेला नाही. इबोला हा एक विषाणूजन्य रक्तस्रावी तापाचा आजार असून तो इबोला विषाणूच्या ‘बुंडिबुग्यो’ स्ट्रेनमुळे होतो. हा अत्यंत गंभीर आजार असून त्यामध्ये मृत्यूदरही मोठ्या प्रमाणात आहे. सध्या बुंडिबुग्यो स्ट्रेनमुळे होणाऱ्या इबोला आजाराच्या प्रतिबंधासाठी किंवा उपचारासाठी कोणतीही लस अथवा विशेष उपचार पद्धतीला मान्यता देण्यात आलेली नाही.

जागतिक आरोग्य संघटनेने आंतरराष्ट्रीय आरोग्य नियम २००५ अंतर्गत १७ मे रोजी या परिस्थितीला ‘आंतरराष्ट्रीय चिंतेची सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले होते. आफ्रिका रोग नियंत्रण आणि प्रतिबंध केंद्रानेही डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो आणि युगांडामध्ये पसरलेल्या बुंडिबुग्यो स्ट्रेन इबोला विषाणूच्या सध्याच्या उद्रेकाला अधिकृतपणे ‘खंडीय सुरक्षेशी संबंधित सार्वजनिक आरोग्य आणीबाणी’ घोषित केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande