व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार; संशयिताचा मृत्यू, ट्रम्प सुरक्षित
वॉशिंग्टन, 24 मे (हिं.स.)।अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ शनिवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. माध्यमांच्या अहवालांनुसार, व्हाईट हाऊस परिसरालगतच्या 17th स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया अव्हेन्यू एनडब्ल्यू परिसरा
व्हाईट हाऊसबाहेर गोळीबार; संशयिताचा मृत्यू, ट्रम्प सुरक्षित


वॉशिंग्टन, 24 मे (हिं.स.)।अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन डीसीमध्ये व्हाईट हाऊसजवळ शनिवारी रात्री अचानक झालेल्या गोळीबारामुळे एकच खळबळ उडाली. माध्यमांच्या अहवालांनुसार, व्हाईट हाऊस परिसरालगतच्या 17th स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया अव्हेन्यू एनडब्ल्यू परिसरात सुमारे 30 गोळ्या झाडल्याचा आवाज ऐकू आला. हा परिसर आयझेनहॉवर कार्यकारी कार्यालयीन इमारतीजवळ आहे.

अहवालांनुसार, एका संशयित बंदूकधाऱ्याने व्हाईट हाऊसबाहेरील सुरक्षा बूथवर गोळीबार सुरू केला. त्या ठिकाणी सीक्रेट सर्व्हिसचे अधिकारी तैनात होते. प्रत्युत्तरादाखल सीक्रेट सर्व्हिसच्या जवानांनीही गोळीबार केला, ज्यामध्ये संशयित हल्लेखोर जखमी झाला. या गोळीबारात एक पादचारीही जखमी झाला असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, सीक्रेट सर्व्हिसच्या कोणत्याही अधिकाऱ्याला दुखापत झाल्याची माहिती नाही.

घटनेच्या वेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते. ते सुरक्षित असल्याची माहिती देण्यात आली आहे.अहवालांमध्ये असेही म्हटले आहे की, कोणत्याही संभाव्य धोक्याला तात्काळ प्रत्युत्तर देण्यासाठी व्हाईट हाऊसच्या छतावर काउंटर स्नायपर्स तैनात करण्यात आले होते. घटनेदरम्यान सुरक्षा यंत्रणांनी संपूर्ण परिसरावर कडक नजर ठेवली होती.

या गोळीबारानंतर संपूर्ण परिसरात मोठा सुरक्षा बंदोबस्त तैनात करण्यात आला. व्हाईट हाऊसच्या नॉर्थ लॉनला तातडीने रिकामे करण्यात आले आणि काही काळासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला. घटनास्थळी उपस्थित पत्रकारांनी सांगितले की, गोळीबाराचा आवाज ऐकताच त्यांना प्रेस ब्रीफिंग रूममध्ये सुरक्षित स्थळी जाण्यास सांगण्यात आले.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर माहिती देताना अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसने सांगितले की, 17वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया अव्हेन्यू परिसरात गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. हा परिसर व्हाईट हाऊसपासून केवळ एका ब्लॉकच्या अंतरावर असल्याचे सांगण्यात आले. एजन्सीने म्हटले की, घटनास्थळी उपस्थित सुरक्षा कर्मचाऱ्यांसोबत मिळून माहितीची पडताळणी केली जात आहे.या घटनेवर एफबीआयचे संचालक काश पटेल यांनीही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, अधिकारी गोळीबाराच्या घटनेवर तत्काळ कारवाई करत आहेत आणि अधिक माहिती समोर येताच जनतेला अद्ययावत माहिती दिली जाईल.

अमेरिकन सीक्रेट सर्व्हिसच्या कम्युनिकेशन कार्यालयाने एका पोस्टमध्ये म्हटले की, “शनिवारी सायंकाळी 6 वाजल्यानंतर काही वेळातच 17वी स्ट्रीट आणि पेनसिल्वेनिया अव्हेन्यू परिसरात एका व्यक्तीने आपल्या बॅगेतून शस्त्र काढून गोळीबार सुरू केला. सीक्रेट सर्व्हिस पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला, ज्यामध्ये संशयिताला गोळी लागली. त्याला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. गोळीबारादरम्यान एका पादचाऱ्यालाही गोळी लागली. घटनेच्या वेळी राष्ट्राध्यक्ष व्हाईट हाऊसमध्ये उपस्थित होते.”

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande