
कोलकाता, 24 मे (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील फलता विधानसभा मतदारसंघात झालेल्या पुनर्मतदानात भारतीय जनता पक्षाने (भाजप) मोठा विजय मिळवत तृणमूल काँग्रेसचा मजबूत बालेकिल्ला उद्ध्वस्त केला. भाजपचे उमेदवार देबाशीष पांडा यांनी एक लाखांहून अधिक मतांच्या प्रचंड फरकाने विजय मिळवला. या निकालाकडे राज्याच्या राजकारणातील मोठ्या बदलाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे.
निवडणूक निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी याला “तृणमूल काँग्रेसच्या पतनाची सुरुवात” असे संबोधत पक्षावर जोरदार हल्लाबोल केला. त्यांनी म्हटले की, फलताच्या जनतेने अनेक वर्षांनंतर स्वतंत्र आणि निष्पक्ष मतदान करून लोकशाहीची पुनर्स्थापना केली आहे.
पोटनिवडणुकीदरम्यान सर्वाधिक चर्चा तृणमूल काँग्रेसचे उमेदवार जहांगिर खान यांच्याबाबत झाली. मतदानाच्या दोन दिवस आधी त्यांनी निवडणुकीच्या मैदानातून माघार घेण्याची घोषणा केली होती. त्यानंतर भाजपचा विजय जवळपास निश्चित मानला जात होता.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी प्रचाराच्या शेवटच्या दिवशी भाजप उमेदवाराला एक लाख मतांनी विजयी करण्याचे लक्ष्य ठेवले होते. मतमोजणीच्या १८ फेऱ्यांपर्यंत भाजप उमेदवार सुमारे ९२ हजार मतांनी आघाडीवर होते, तर अंतिम विजयाचा फरक एक लाख आठ हजारांहून अधिक झाला.
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, मागील लोकसभा निवडणुकीत याच भागातून तृणमूल काँग्रेसला सुमारे १.७० लाख मतांची आघाडी मिळाली होती, मात्र या पोटनिवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराला अवघी साडेपाच हजारांच्या आसपास मते मिळाली.
मतदानादरम्यान अनेक मतदान केंद्रांवर तृणमूल काँग्रेसचा एकही प्रतिनिधी उपस्थित नव्हता. तसेच मतमोजणी केंद्रातही पक्षाची सक्रियता अत्यंत कमकुवत दिसून आली. या पोटनिवडणुकीत डाव्या आघाडीसमर्थित उमेदवार शंभूनाथ कुर्मी यांनी सुमारे ३७ हजार मते मिळवत लक्ष वेधले. तर काँग्रेसचे उमेदवार अब्दुर रज्जाक मोल्ला यांना सुमारे साडेनऊ हजार मते मिळाली.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, तृणमूल काँग्रेस कमकुवत होत असल्याने राज्यातील विरोधी राजकारणात नव्या शक्यता निर्माण होऊ शकतात. फलता पोटनिवडणुकीची पार्श्वभूमी अत्यंत वादग्रस्त राहिली. विधानसभा निवडणुकीदरम्यान अनेक मतदान केंद्रांवरील ईव्हीएममध्ये अत्तर, शाई आणि टेप लावल्यासारख्या अनियमिततेचे आरोप झाले होते. त्यानंतर निवडणूक आयोगाने निवडणूक रद्द करून पुनर्मतदान घेण्याचा निर्णय घेतला होता.
याच काळात जहांगिर खान आणि उत्तर प्रदेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी अजयपाल शर्मा यांच्यातील तणावाच्या चर्चाही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरल्या होत्या. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर फलतामधील तृणमूल काँग्रेसची संघटनात्मक सक्रियता जवळपास ठप्प झाली होती. स्थानिक लोकांमध्ये दीर्घकाळ मतदान करू न दिल्याचे आणि “धमकी संस्कृती”चे आरोप भाजपने निवडणुकीचा प्रमुख मुद्दा बनवला.
मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी अनेक जाहीर सभा आणि रोड शो घेतले, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. त्यांनी फलतासाठी विशेष विकास पॅकेजची घोषणाही केली होती, ज्याचा प्रभाव मतदारांवर स्पष्टपणे दिसून आला.
निवडणूक निकालानंतर शुभेंदू अधिकारी यांनी सोशल मीडियावर सविस्तर संदेश प्रसिद्ध करत म्हटले की, “फलताच्या जनतेने लोकशाहीची पुन्हा स्थापना केली आहे. भाजप उमेदवाराला एक लाखांहून अधिक मतांच्या फरकाने विजयी करणाऱ्या मतदारांना मी नमन करतो. विकासाच्या माध्यमातून आम्ही या विश्वासाचे ऋण फेडू.” त्यांनी तृणमूल काँग्रेसवर सरकारी यंत्रणेचा गैरवापर, सिंडिकेट राज आणि भीतीचे राजकारण केल्याचा आरोप केला. नाव न घेता जहांगिर खान यांच्यावर निशाणा साधताना त्यांनी म्हटले की, “एका तथाकथित सेनापतीने लोकशाहीचा गळा घोटण्यात कोणतीही कसर सोडली नाही.”
मुख्यमंत्र्यांनी दावा केला की, “१५ वर्षांनंतर लोकांना स्वतंत्रपणे मतदान करण्याची संधी मिळाली आणि खरा जनादेश समोर आला.” राजकीय वर्तुळात या विजयाकडे पश्चिम बंगालच्या बदलत्या राजकारणाचे संकेत म्हणून पाहिले जात आहे. भाजप हा मोठा जनादेश असल्याचे सांगत आहे, तर तृणमूल काँग्रेससमोर संघटनात्मक पकड कायम राखण्याचे आव्हान अधिक कठीण झाले आहे.
विशेष म्हणजे, ज्या भागात तृणमूल काँग्रेसला हा दारुण पराभव स्वीकारावा लागला, तो भाग डायमंड हार्बर लोकसभा मतदारसंघात येतो. येथून माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी हे तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव आणि लोकसभेतील खासदार आहेत.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule