
रायगड, 25 मे (हिं.स.) - महाबळेश्वर-पोलादपूर मार्गावरील धोकादायक आंबेनळी घाटात रविवारी मध्यरात्री भीषण अपघात झाला. यात आठ तरुणांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोकण सफारीवरून परतणारी स्कॉर्पिओ जीप अचानक अनियंत्रित होऊन खोल दरीत कोसळल्याने हा अपघात घडला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात पोलादपूर तालुक्यातील दाबेली गावाजवळ सोमवारी पहाटे सुमारे २:४५ वाजण्याच्या सुमारास घडला. कोरेगाव तालुक्यातील (जि. सातारा) आसगाव येथील काही तरुण कोकणात पर्यटनासाठी गेले होते. सफर आटोपून परतीच्या प्रवासात ते आंबेनळी घाटातून जात असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि स्कॉर्पिओ थेट सुमारे ८०० फूट खोल दरीत कोसळली. काही स्थानिकांच्या माहितीनुसार ही दरी तब्बल १५०० फूट खोल असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस, महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड बचाव पथक, सिस्केप महाड, आपदा मित्र तसेच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. दरी अत्यंत खोल आणि दुर्गम असल्यामुळे बचावकार्य करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. बचाव पथकांकडून दुर्बिणींच्या सहाय्याने मृतदेहांचा शोध घेण्यात येत असून दोरखंडांच्या मदतीने जवान दरीत उतरले आहेत.
दरम्यान, आतापर्यंत दोन मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले असून उर्वरित सहा जणांचा शोध सुरू आहे. बाहेर काढण्यात आलेले मृतदेह पोलादपूर येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.
अपघातामध्ये मृत्यू झालेल्यांची नावे
महेश अनिल पवार (वय २५) आदित्य अशोक साळुंखे (वय २१) रितेश राजेंद्र लोखंडे (वय २५) सुहास जितेंद्र लोखंडे (वय २०) अंश समीर चव्हाण (वय १८) उत्कर्ष आनंद शिंगटे (वय २१) अनिल अभिमन्यू शिंगटे (वय २५) नितीन किसन नायकोंडे (वय ३५)
मंत्री भरत गोगावले यांच्याकडून शोक व्यक्त
दरम्यान आंबेनळी घाटात एसयूव्ही दरीत कोसळून आठ जणांचा मृत्यू झाल्याची घटना अत्यंत दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केली. “आंबेनळी घाटातील रस्त्याचे काम सध्या सुरू आहे. अशा ठिकाणी अपघात होत असतील तर ती अत्यंत दुर्दैवी बाब आहे. यापूर्वीही घाटात अपघात झाले आहेत. अलीकडे जो अपघात झाला होता तो घाटाच्या एका बाजूस झाला होता, तर हा अपघात दुसऱ्या बाजूस झाला आहे. त्यामुळे या दुर्घटनांचे नेमके कारण शोधणे गरजेचे आहे. घाट परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले. दोन्ही बाजूंना मजबूत कठडे उभारण्याबाबत संबंधित विभागाशी चर्चा करून कार्यवाही करण्यात येईल. तसेच मृतांच्या कुटुंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करणार असल्याचेही गोगावले यांनी स्पष्ट केले.
---------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)