काँगोमध्ये इबोलाचा कहर; ९०० हून अधिक संशयित रुग्णांनी वाढवली जागतिक चिंता
किंशासा, 25 मे (हिं.स.)।आफ्रिकन देश काँगोमध्ये इबोला विषाणूचा धोका झपाट्याने वाढत आहे. देशाच्या पूर्व भागात पसरलेल्या संसर्गाने आता गंभीर रूप धारण केले आहे. काँगो सरकारच्या माहितीनुसार, संशयित इबोला रुग्णांची संख्या ९०० च्या पुढे गेली आहे. सतत वाढण
काँगोमध्ये इबोलाचा कहर; ९०० हून अधिक संशयित रुग्णांनी वाढवली जागतिक चिंता


किंशासा, 25 मे (हिं.स.)।आफ्रिकन देश काँगोमध्ये इबोला विषाणूचा धोका झपाट्याने वाढत आहे. देशाच्या पूर्व भागात पसरलेल्या संसर्गाने आता गंभीर रूप धारण केले आहे. काँगो सरकारच्या माहितीनुसार, संशयित इबोला रुग्णांची संख्या ९०० च्या पुढे गेली आहे. सतत वाढणारे संसर्ग आणि मृत्यू यामुळे आरोग्य यंत्रणांची चिंता वाढली आहे. जागतिक आरोग्य संघटनानेही या उद्रेकाला काँगोसाठी मोठा धोका असल्याचे म्हटले आहे. मात्र, जागतिक स्तरावर हा संसर्ग पसरण्याचा धोका सध्या कमी मानला जात आहे. दरम्यान, भारत सरकारनेही आपल्या नागरिकांसाठी अॅडव्हायझरी जारी करून सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

काँगोच्या संचार मंत्रालयाने सांगितले की, देशात आतापर्यंत ९०४ संशयित रुग्ण आढळले आहेत, तर ११९ संशयित मृत्यूंची नोंद झाली आहे. यापूर्वी ७०० हून अधिक रुग्ण आणि १७० पेक्षा जास्त मृत्यूंची माहिती देण्यात आली होती. संसर्गाचा सर्वाधिक परिणाम इतुरी प्रांतात दिसून येत आहे. आरोग्य संस्थांच्या मते, सध्याच्या उद्रेकासाठी बंडिबुग्यो स्ट्रेन जबाबदार मानला जात आहे. हा इबोलाचा अत्यंत धोकादायक प्रकार असून, सध्या यासाठी कोणतीही मान्यताप्राप्त लस किंवा विशेष औषध उपलब्ध नाही. त्यामुळे परिस्थिती अत्यंत गंभीर मानली जात आहे.

काँगोमध्ये झपाट्याने वाढणाऱ्या इबोला रुग्णसंख्येमुळे जगभरात चिंता वाढली आहे. तज्ज्ञांच्या मते, योग्य वेळी संसर्ग रोखला गेला नाही तर तो इतर देशांमध्येही पसरू शकतो. बंडिबुग्यो स्ट्रेनविरोधात अद्याप प्रभावी लस उपलब्ध नाही. अनेक देशांनी आफ्रिकन देशांच्या प्रवासाबाबत सतर्कता वाढवली आहे. इबोलाने पुन्हा एकदा दाखवून दिले आहे की संसर्गजन्य आजार वेगाने जागतिक धोका बनू शकतात.

भारत सरकारने काँगो, युगांडा आणि आसपासच्या देशांच्या प्रवासाबाबत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला दिला आहे. अॅडव्हायझरीमध्ये म्हटले आहे की, दक्षिण सुदानसारख्या शेजारी देशांमध्येही संसर्ग पसरण्याचा धोका कायम आहे. त्यामुळे भारतीय नागरिकांनी या देशांचा प्रवास टाळावा, असा सल्ला देण्यात आला आहे. जे भारतीय सध्या या देशांमध्ये वास्तव्यास आहेत, त्यांनी स्थानिक प्रशासन आणि आरोग्य विभागाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे सांगण्यात आले आहे. सरकारने नागरिकांना अतिरिक्त खबरदारी घेण्याचे आणि गर्दीच्या ठिकाणांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

भारतामध्ये आतापर्यंत इबोलाचा फक्त एकच रुग्ण आढळला आहे. वर्ष २०१४ मध्ये पश्चिम आफ्रिकेत पसरलेल्या इबोला संसर्गाच्या काळात लायबेरियाहून परतलेल्या २६ वर्षीय भारतीय नागरिकामध्ये हा विषाणू आढळून आला होता. विमानतळावरील तपासणीदरम्यान त्याची ओळख पटली होती. त्यानंतर त्याला विलगीकरणात ठेवून यशस्वी उपचार करण्यात आले आणि संसर्ग पसरण्यापासून रोखण्यात यश आले. त्यानंतर भारतात इबोलाचा दुसरा कोणताही रुग्ण आढळलेला नाही. सध्या भारतात इबोला संसर्गाचा कोणताही सक्रिय रुग्ण नाही.

इबोला हा अत्यंत धोकादायक आणि अनेकदा जीवघेणा विषाणू आहे. हा संसर्ग संक्रमित प्राण्यांमधून माणसांमध्ये पसरतो आणि त्यानंतर संक्रमित व्यक्तीच्या संपर्कातून इतरांमध्ये झपाट्याने फैलावतो. या आजाराची लक्षणे म्हणजे तीव्र ताप, उलट्या, अशक्तपणा, अंगदुखी आणि अंतर्गत रक्तस्राव. गंभीर परिस्थितीत रुग्णाचा मृत्यूही होऊ शकतो. जागतिक आरोग्य संघटनाने संसर्ग रोखण्यासाठी स्वच्छता, संक्रमित व्यक्तींपासून अंतर आणि वैद्यकीय सुरक्षाविषयक उपायांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. या विषाणूचे नाव काँगोमधून वाहणाऱ्या इबोला नदीवरून ठेवण्यात आले आहे, जिथे या आजाराची प्रथम ओळख झाली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande