
अमरावती, 03 मे (हिं.स.) | येथील मेळघाट व्याघ्र प्रकल्प परिसरातील आदिवासी भागात असलेले ब्रिटीशकालीन पूल सध्या अतिशय जीर्ण अवस्थेत असून तुटण्याच्या स्थितीत पोहोचले आहेत. या पुलांची मुदत संपलेली असून याबाबत ब्रिटीश सरकारकडून भारत सरकारला पत्रही प्राप्त झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या पुलांच्या दुरुस्ती व पुनर्बांधणीच्या कामांना तात्काळ मान्यता देण्याची मागणी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल येवले यांनी केली आहे.
तसेच, व्याघ्र प्रकल्प प्रशासनाने या कामांसाठी आवश्यक परवानग्या लवकरात लवकर द्याव्यात, तसेच अस्तित्वात असलेल्या रस्त्यांना देखील नियमित करण्याची मागणी करण्यात आली आहे. अन्यथा शांत असलेला आदिवासी समाज आक्रमक भूमिका घेत आंदोलन छेडेल, असा इशाराही देण्यात आला आहे.
दरम्यान, एका बाजूला जनहिताची कामे अडवली जात असताना दुसऱ्या बाजूला दिल्ली वाइल्ड बोर्डाची परवानगी नसताना प्रकल्पाच्या अंतर्गत शेकडो हेक्टर जमिनीवर खोदकाम सुरू असल्याचा आरोप करण्यात आला आहे. जेसीबीद्वारे रस्ते तयार केले जात असल्याने या प्रकरणाची केंद्रीय समितीमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणीही राहुल येवले यांनी केली आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी