
अकोला, 03 मे (हिं.स.)।
विदर्भ, मराठवाडा, तेलंगणा व आंध्र प्रदेशला जोडणाऱ्या तिरुपती-अकोला-तिरुपती साप्ताहिक एक्सप्रेस क्र. 17429/17430 ची नियमित सेवा आज रविवार, 3 मे रोजी सकाळी 8 वाजता अकोला रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 5 वरून सुरू झाली. खासदार अनुप भाऊ धोत्रे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून गाडी तिरुपतीकडे रवाना झाली.
हिरवा झेंडा दाखवताच ‘जय महालक्ष्मी, जय तिरुपती बालाजी, गोविंदा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आगे बढो, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आगे बढो, खासदार अनुप धोत्रे आगे बढो, आमदार रणधीर सावरकर आगे बढो, भारत माता की जय, वंदे मातरम, जय भवानी जय शिवाजी’ अशा गगनभेदी घोषणांनी संपूर्ण प्लॅटफॉर्म दुमदुमून गेला.
यावेळी आमदार रणधीर सावरकर, महापौर शारदाताई खेडकर, स्थानिक लोकप्रतिनिधी, रेल्वे विभागाकडून स्टेशन प्रबंधक संतोष कवडे, दक्षिण मध्य रेल्वेचे डीसीएम रितेश कुमार यांच्यासह भाजपा पदाधिकारी, प्रशासकीय अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
खासदार अनुप धोत्रे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी व रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या नेतृत्वात तीर्थक्षेत्रे जोडणाऱ्या गाड्या सुरू होत आहेत. माझ्या पाठपुराव्यामुळे अकोल्याला आत्तापर्यंत 20 नव्या गाड्या मंजूर झाल्या आहेत. अकोला स्टेशन दक्षिण मध्य रेल्वेत समाविष्ट करणे, प्लॅटफॉर्मवर पासवर्ड सुविधा, डिजिटल डिस्प्ले बसवणे यासाठी मी महाप्रबंधकांशी संपर्क साधला आहे. लवकरच सुविधा मिळतील.”
या गाडीमुळे औंढा नागनाथ, नांदेड, निजामाबाद, सिकंदराबाद मार्गे थेट तिरुपती गाठता येणार असून शेतकरी, व्यापारी व भाविकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे