

-एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह सापडले
नवी दिल्ली, 03 मे (हिं.स.)। राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील विवेक विहार परिसरात आज पहाटे चारमजली निवासी इमारतीत आग लागली. या दुर्घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले आहे. दोन जण किरकोळ भाजले असून त्यांना गुरु तेग बहादुर रुग्णालय येथे दाखल करण्यात आले आहे.
पोलीसांच्या माहितीनुसार, पहाटे सुमारे 3:48 वाजता विवेक विहार पोलीस ठाण्याला पीसीआर कॉलद्वारे आग लागल्याची माहिती मिळाली. पोलीस, अग्निशमन दल तसेच इतर पथके तात्काळ घटनास्थळी (विवेक विहार फेज-1 येथील घर क्रमांक बी-13) दाखल झाली. दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या मजल्यावर मोठ्या ज्वाळा उसळत होत्या. अग्निशमन दल आणि पोलीसांनी संयुक्त बचावकार्य राबवत आगीत अडकलेल्या सुमारे 10 ते 15 जणांना सुरक्षित बाहेर काढले. मृतांची ओळख पटवण्याची प्रक्रिया सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुसऱ्या मजल्यावरील मागच्या फ्लॅटमधून एकाच कुटुंबातील पाच सदस्यांचे मृतदेह सापडले आहेत. मृतांमध्ये अरविंद जैन (६०), त्यांची पत्नी अनिता जैन (५८), मुलगा निशांत जैन (३५), सून आंचल जैन (३३) आणि दीड वर्षांचा नातू मास्टर आकाश जैन यांचा समावेश आहे. शिखा जैन (४५) यांचा मृतदेह पहिल्या मजल्यावरून सापडला. तिसऱ्या मजल्यावरून दुसऱ्या एका कुटुंबातील तीन सदस्यांचे मृतदेह सापडले असून, त्यात नितीन जैन (५०), त्यांची पत्नी शैला जैन (४८) आणि मुलगा सम्यक जैन (२५) यांचा समावेश आहे. अपघातात भाजलेले नवीन जैन (४८) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या प्रकृतीबद्दल अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.
आग नियंत्रणात आणण्यासाठी 12 अग्निशमन गाड्या पाचारण करण्यात आल्या. यासाठी अनेक तास लागले. पोलीस आणि अग्निशमन विभाग आग लागण्याच्या कारणांची चौकशी करत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार, एसीमध्ये स्फोट झाल्यामुळे आग लागली असावी. पोलीसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, इमारतीतील सुरक्षा व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि बांधकाम मानकांचीही तपासणी केली जाणार आहे.
अग्निशमन विभागाचे प्रवक्ते ए. के. मलिक यांच्या मते, या दुर्घटनेत मृतांचा आकडा नऊ झाला आहे. आग इमारतीतील सहा फ्लॅटमधील घरगुती वस्तूंमुळे पसरली. बचाव मोहिमेदरम्यान विविध मजल्यांवरून नऊ जळालेले मृतदेह बाहेर काढण्यात आले. सर्व मृतदेह दिल्ली पोलीसांच्या गुन्हे शाखेकडे सुपूर्द करण्यात आले आहेत. प्राथमिक माहितीनुसार आग इमारतीतील सहा फ्लॅटमध्ये पसरली होती. पहिल्या मजल्यावरून एक मृतदेह, दुसऱ्या मजल्यावरून पाच मृतदेह तसेच जिन्याच्या वर असलेल्या एका कुलूपबंद दरवाज्यातून तीन मृतदेह आढळले. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार तो दरवाजा बंद होता. असा अंदाज व्यक्त केला जात आहे की काही लोक धूर आणि आगीपासून वाचण्यासाठी तेथे गेले, मात्र बाहेर पडू शकले नाहीत.
अग्निशमन विभागाने सांगितले की आग लागण्याच्या कारणांची चौकशी सुरू आहे. प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किटसह इतर संभाव्य कारणांचाही तपास केला जात आहे. तसेच इमारतीत पुरेशा अग्निसुरक्षा उपाययोजना होत्या का आणि सुरक्षा नियमांचे उल्लंघन झाले का, याचीही चौकशी केली जाणार आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच आगीचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule