
भोपाळ, 03 मे (हिं.स.)। मध्य प्रदेशातील जबलपूर जिल्ह्यात नर्मदा नदी वर बांधलेल्या बर्गी धरणात झालेल्या क्रूझ दुर्घटनेनंतर मदत व बचावकार्य सातत्याने सुरू आहे. दरम्यान, रविवारी सकाळी शोधमोहीमेदरम्यान रेस्क्यू टीमला एका मुलाचा मृतदेह सापडला आहे. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांची संख्या वाढून 12 झाली आहे. अजून एक व्यक्ती बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे.
30 एप्रिलच्या संध्याकाळी जोरदार वादळ आणि पावसामुळे मध्य प्रदेश पर्यटन विभागाची पर्यटकांनी भरलेली क्रूझ बरगी धरणात बुडाली होती. या क्रूझमध्ये सुमारे 47 पर्यटक प्रवास करत होते. सुरुवातीच्या दोन दिवसांत चाललेल्या बचावकार्यादरम्यान 9 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते, तर 29 जणांना वाचवण्यात यश आले होते. त्यानंतर शनिवारी (2 मे) संध्याकाळी 6 वाजता दोन मुलांचे मृतदेह सापडले. त्यापैकी एकाची ओळख श्रीतमिल (5) कामराज यांचा मुलगा आणि दुसऱ्याची ओळख विराज (5) कृष्ण सोनी यांचा मुलगा अशी झाली होती.
जोरदार पाऊस आणि वादळामुळे शनिवारी बचावकार्य थांबवण्यात आले होते. रविवारी सकाळी पुन्हा शोधमोहीम सुरू करण्यात आली. यावेळी सकाळी सुमारे 6 वाजता घटनास्थळापासून काही अंतरावर आणखी एका मुलाचा मृतदेह सापडला. मृत मुलाचे नाव मयूरन असून तो तमिळनाडूतील त्रिची येथील रहिवासी होता. तो आपल्या कुटुंबासह नातेवाईकांकडे जबलपूरला आला होता.
या दुर्घटनेत आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये नीतू सोनी (43), रहिवासी कोतवाली, जबलपूर; सौभाग्यम अलागन (42), रहिवासी अन्नानगर, वेस्ट तारापूरम, तमिळनाडू; मधुर मैसी (62), रहिवासी खाजन बस्ती, नवी दिल्ली; काकुलाझी (38) पत्नी कामराज, रहिवासी वेस्ट लँड खमरिया, जबलपूर; रेशमा सैयद (66), रहिवासी सिव्हिल लाइन, भसीन आर्केड, जॅक्सन हॉटेलजवळ; शमीम नकवी (68), रहिवासी डेरखी, भोपाल; मरीना मैसी (39) पत्नी प्रदीप मैसी, रहिवासी दिल्ली; त्रिशान (4 वर्ष) प्रदीप मैसी यांचा मुलगा, रहिवासी दिल्ली; ज्योती सेन, रहिवासी फूटाताल, घमापूर पुढे, जबलपूर; श्रीतमिल (5) कामराज यांचा मुलगा; विराज (5) कृष्ण सोनी यांचा मुलगा आणि मयूरम (9 वर्ष) परिमल यांचा मुलगा यांचा समावेश आहे. आता फक्त कामराज आर श्रीरामालिंगम यांचा मुलगा हे बेपत्ता असून त्यांचा शोध सुरू आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफसोबत सैन्याचे जवानही शोधमोहीमेत सहभागी आहेत.
बर्गी सिटीचे सीएसपी अंजुल अयंक मिश्रा यांनी सांगितले की या क्रूझ दुर्घटनेत मृत्यू झालेल्या तमिळनाडूतील पर्यटकांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवले जात आहेत. जबलपूरच्या डुमना विमानतळावरून कार्गो विमानाद्वारे मृतदेह त्रिचीकडे रवाना करण्यात आले आहेत. नातेवाईकही त्यांच्यासोबत गेले आहेत. प्रशासनाकडून इतर मृतदेहही टप्प्याटप्प्याने त्यांच्या मूळ राज्यांत पाठवण्याची तयारी सुरू आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule