राहुल गांधींच्या पाठिंब्याबद्दल अभिषेक बॅनर्जी यांनी मानले आभार
कोलकाता, 31 मे (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाकडून झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात बाधित झ
Abhishek Banerjee expressed gratitude Rahul Gandhi support


कोलकाता, 31 मे (हिं.स.)। पश्चिम बंगालमधील दक्षिण २४ परगना जिल्ह्यातील सोनारपूर येथे तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांच्यावर जमावाकडून झालेल्या हल्ल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. निवडणूक निकालानंतर झालेल्या हिंसाचारात बाधित झालेल्या कुटुंबांची भेट घेण्यासाठी अभिषेक बॅनर्जी गेले असताना हा प्रकार घडला. या घटनेनंतर तृणमूल काँग्रेस आणि भारतीय जनता पक्ष यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार मालिका सुरू झाली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याचा तीव्र निषेध करत तो लोकशाहीवरील थेट आघात असल्याचे म्हटले आहे. राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ पोस्ट केल्यानंतर अभिषेक बॅनर्जी यांनी त्यांचे आभार मानले आहेत .

राहुल गांधी यांनी अभिषेक बॅनर्जी यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत निंदनीय असल्याचे सांगितले. एका खासदारावर हल्ला होणे म्हणजे केवळ एका व्यक्तीवर नव्हे, तर त्यांना निवडून देणाऱ्या जनतेवर आणि संपूर्ण लोकशाहीवर झालेला हल्ला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले. हा प्रकार भारतीय जनता पक्षाच्या सूडभावनेच्या राजकारणाचे भयंकर रूप असल्याची टीकाही त्यांनी केली. राजकीय मतभेद कधीही हिंसेचे कारण ठरू शकत नाहीत, असे सांगून राहुल गांधी यांनी केंद्र आणि राज्य सरकारने दोषींवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी केली.

पुढे राहुल गांधी म्हणाले, अभिषेकजी, माझ्या संवेदना तुमच्या आणि तुमच्या कुटुंबीयांसोबत आहेत. तुम्ही लवकर बरे व्हाल अशी आशा व्यक्त केली होती.

अभिषेक बॅनर्जी यांनी आपल्या एक्स पोस्ट मध्ये म्हटले की, राहुलजी आपल्या काळजीबद्दल आणि सातत्यपूर्ण पाठिंब्याबद्दल धन्यवाद. भारताच्या आत्म्याचे संरक्षण करण्यासाठी, त्याच्या लोकशाही संस्थांचे रक्षण करण्यासाठी आणि आपल्या संविधानात निहित मूल्यांचे जतन करण्यासाठी सुरू असलेल्या लढ्यात आम्ही एकजूट आणि ठामपणे उभे आहोत. गेल्या वर्षी, मी ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत सर्वपक्षीय प्रतिनिधीमंडळाचा भाग म्हणून भारताचे प्रतिनिधित्व करत पाच देशांचा दौरा केला. मी माझ्या देशाची बाजू मांडली आणि दहशतवादाविरोधात एकजुटीने उभा राहिलो.

पुढे ते म्हणाले की आज, मी स्वतःला राजकीय हिंसाचाराचा आणि राष्ट्रवादाचे स्वयंघोषित रक्षक असल्याचा दावा करणाऱ्यांकडून प्रायोजित राज्य दहशतवादाचा बळी म्हणून पाहत आहे. हीच आजच्या भाजपची वास्तवता आहे. तुम्ही त्यांना पाठिंबा दिलात तर तुम्ही देशभक्त ठरता. तुम्ही त्यांच्यावर प्रश्न उपस्थित केले तर तुम्ही लक्ष्य बनता. तुम्ही त्यांच्यासोबत उभे राहिलात तर तुमचा गौरव केला जातो. पण तुम्ही त्यांच्याविरोधात उभे राहिलात तर ते तुम्हाला गप्प करण्याचा प्रयत्न करतात.

ते पुढे म्हणाले की, माझी तत्त्वे सोडून आरामदायी जीवन जगण्यापेक्षा लोकशाहीचे रक्षण करताना धमक्यांना सामोरे जाणे मला अधिक मान्य आहे. सत्ता तात्पुरती असते. जनतेची इच्छा कायमस्वरूपी असते. मी फक्त जनतेपुढे नतमस्तक होईन, सत्तेत असलेल्या व्यक्तींपुढे कधीही नाही.

लोकशाही कमकुवत करण्याचा आणि देशात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात आमचा संघर्ष सुरूच राहील. भारत एकसंघ आहे आणि आम्ही सर्वजण मिळून भीती, द्वेष, हिंसा आणि दडपशाहीच्या राजकारणाचा पराभव करू, तसेच जनतेचा आवाजच अंतिम विजय मिळवेल याची खात्री करू असे अभिषेक बॅनर्जी म्हणाले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule


 rajesh pande