गुजरातमध्ये दोन एसटी बस धडकल्या, 7 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
सुरत, 02 जून (हिं.स.) : गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज, मंगळवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 17 जण गंभीर जखमी आहेत. यासंदर्भा
बारडोली येथील एसटी बसच्या अपघातानंरची छायाचित्रे


सुरत, 02 जून (हिं.स.) : गुजरातच्या सूरत जिल्ह्यातील बारडोली तालुक्यात आज, मंगळवारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात घडला. यात 7 प्रवाशांचा मृत्यू झाला असून सुमारे 17 जण गंभीर जखमी आहेत.

यासंदर्भातील अधिकृत माहितीनुसार राज्य परिवहन महामंडळाच्या दोन बसची बारडोलीनजीक भीषण टक्कर झाली. रस्त्यावर उलटलेल्या टँकरला वाचवण्याच्या नादात एसटी बस चालकाचा (वाहन क्र. एम.एच. 18 बीझेड 1258) वाहनावरील ताबा सुटला आणि समोरून येणाऱ्या अन्य एका एसटी बसशी (वाहन क्र. एम.एच. 20 बीएल 3390) जोरदार टक्कर झाली. यापैकी एक बस सीएनजीवर चालणारी असल्यामुळे अपघातानंतर गॅस गळती होऊन बसला आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्यामुळे प्रवाशांचा एकच गोंधळ उडाला. अपघातग्रस्त बसच्या प्रवाशांनी केलेल्या आरडाओरड्यामुळे संपूर्ण परिसर निनादून गेल्याचे प्रत्यक्षदर्शीने सांगितले.या अपघातात दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले. एका बसचा पुढील भाग पूर्णपणे चेंदामेंदा झाला, तर दुसरी बस रस्त्याच्या खाली जाऊन उलटली. आगीच्या ज्वाळांमध्ये अडकलेल्या प्रवाशांना वाचवण्यासाठी स्थानिक नागरिकांनी तत्काळ धाव घेतली.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दल, पोलिस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले असून जखमींना तातडीने विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. काही गंभीर जखमींवर सूरत सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू आहेत.प्राथमिक माहितीनुसार, या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने तपास सुरू केला असून अपघाताचे नेमके कारण शोधले जात आहे.

--------------------------

हिंदुस्थान समाचार / मनीष कुलकर्णी


 rajesh pande