
नागरिकांना ऑनलाइन नोंदणीचे आवाहन
रायगड, 04 मे (हिं.स.) : भारत सरकारच्या आगामी जनगणना 2027 मोहिमेअंतर्गत ‘स्व-गणना’ (Self Enumeration) उपक्रमाचा शुभारंभ पनवेल महानगरपालिका मुख्यालयात महापौर नितीन पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला लोकप्रतिनिधी, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान महापौर नितीन पाटील, इतर लोकप्रतिनिधी तसेच अधिकाऱ्यांनी स्वतः ऑनलाइन माध्यमातून ‘स्व-गणना’ प्रक्रिया पूर्ण करून नागरिकांसमोर आदर्श निर्माण केला. नागरिकांनी स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची माहिती डिजिटल पद्धतीने नोंदवावी, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात आले.
“जनगणना ही देशाच्या विकास आराखड्याचा पाया आहे. प्रत्येक नागरिकाने अचूक माहिती देणे अत्यंत आवश्यक आहे. ‘स्व-गणना’मुळे ही प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि वेळेची बचत करणारी ठरेल,” असे मत महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केले.
ही ‘स्व-गणना’ मोहीम आगामी १५ मे पर्यंत राबविण्यात येणार आहे. भारत सरकारने यासाठी मोबाईल ॲप आणि वेबलिंकची सुविधा उपलब्ध करून दिली असून नागरिकांनी se.census.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन आपल्या कुटुंबाची माहिती अचूक आणि वेळेत भरावी, असे आवाहन करण्यात आले आहे. ही प्रक्रिया पूर्णतः ऑनलाइन, सुरक्षित आणि सोपी असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
पनवेल महानगरपालिका आयुक्त मंगेश चितळे यांनीही नागरिकांना या उपक्रमात सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. स्व-गणनेमुळे वेळेची बचत होण्याबरोबरच अचूक माहिती नोंदविणे शक्य होईल आणि प्रशासनाचे काम अधिक सुलभ होईल, असे त्यांनी नमूद केले.
पनवेल महानगरपालिका प्रशासन जनगणना 2027 यशस्वी करण्यासाठी सज्ज असून नागरिकांच्या सक्रिय सहभागातून ही मोहीम अधिक प्रभावी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
-------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)