द्वारका परिसरातील संथ कामावर आ. देवयानी फरांदे संतप्त
प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरले नाशिक, 04 मे (हिं.स.) : द्वारका परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील संथ गतीमुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर स
MLA Farande angry over


प्रशासन व ठेकेदाराला धारेवर धरले

नाशिक, 04 मे (हिं.स.) : द्वारका परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामातील संथ गतीमुळे आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. वाढत्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (दि. ४) आमदार देवयानी फरांदे यांनी अचानक पाहणी दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला. या दौऱ्यात प्रशासन आणि ठेकेदाराच्या कामातील गंभीर त्रुटी उघड झाल्या.

पाहणीत ठेकेदाराने वाहतूक व्यवस्थेसाठी १२ वॉर्डन नेमल्याचा दावा केला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ २ वॉर्डन उपस्थित असल्याचे दिसून आले, तर काही नावे फक्त कागदावरच असल्याचे स्पष्ट झाले. या प्रकारावर आमदारांनी तीव्र नाराजी व्यक्त करत “फक्त कागदावर पगार दाखवण्यासाठीच वॉर्डन नेमले आहेत का?” असा सवाल उपस्थित केला.

वाहतूक व्यवस्थेचा अभाव आणि पोलिस यंत्रणेचे अपुरे नियंत्रण यामुळे द्वारका चौक परिसरात परिस्थिती अधिकच बिघडल्याचे दिसून आले. सर्व्हिस रोडवर अनधिकृतपणे उभ्या असलेल्या रिक्षा, खासगी ट्रॅव्हल्स आणि बेशिस्त पार्किंगमुळे रस्त्यांची रुंदी कमी झाली असून वाहतूक कोंडी वाढली आहे.

काठेगल्लीकडे जाणाऱ्या मार्गावर रस्त्यात उभ्या केलेल्या दुचाकींमुळे संतप्त झालेल्या आमदार फरांदे यांनी पोलिसांना तत्काळ कारवाईचे निर्देश दिले. तसेच बेशिस्त वाहनांवर कारवाई करत त्यांची हवा सोडण्याचेही आदेश त्यांनी दिले.

दरम्यान, आमदार फरांदे यांनी प्रशासनाला गुरुवार (दि. ७) पर्यंत परिस्थितीत सुधारणा करण्याचा अल्टिमेटम दिला आहे. अन्यथा थेट रस्त्यावर उतरून आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

-------------------

हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV


 rajesh pande