
वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे खबरदारीचे पाऊल
मनमाड, 04 मे (हिं.स.)।
:राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना, नाशिक जिल्ह्यातील मनमाड शहरातही तापमानाचा पारा चांगलाच चढला आहे. या पार्श्वभूमीवर, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी आणि उष्माघाताच्या रुग्णांना त्वरित उपचार मिळवून देण्यासाठी मनमाड उपजिल्हा रुग्णालयात स्वतंत्र 'उष्माघात कक्ष' (Heat Stroke Ward) सुरू करण्यात आला आहे.या विशेष कक्षात उष्माघाताने बाधित रुग्णांसाठी स्वतंत्र खाटांची (Beds) व्यवस्था करण्यात आली असून, आवश्यक ती औषधे, ओआरएस (ORS) आणि इतर वैद्यकीय उपकरणे सज्ज ठेवण्यात आली आहेत. रुग्णांना तातडीने थंडावा मिळावा यासाठी या कक्षात विशेष सोय करण्यात आली असल्याची माहिती डॉ योगीराज शिंदे यांनी दिली आहे.
याबाबत माहिती देताना उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ. योगीराज शिंदे यांनी सांगितले की, वाढत्या तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असते. विशेषतः चक्कर येणे, शरीराचे तापमान वाढणे, मळमळ होणे किंवा प्रचंड थकवा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास नागरिकांनी त्याकडे दुर्लक्ष करू नये. अशा रुग्णांना तात्काळ उपचार मिळावेत यासाठी आम्ही हा स्वतंत्र कक्ष सज्ज ठेवला आहे. सध्या या कक्षात 5 बेड सज्ज करण्यात आले असुन जसजशी गरज भासेल तसतशी त्यांची संख्या वाढवता येईल असेंही डॉ शिंदे यांनी सांगितले आहे.मनमाड शहरात देखील सध्या मोठ्या प्रमाणावर उष्णता वाढली आहे त्यामुळे आम्ही उष्मांघात कक्ष सज्ज करून ठेवला आहे.
नागरिकांनी खालील काळजी घ्यावी...!
तहान लागलेली नसली तरीही दिवसभर ठराविक अंतराने पाणी पीत राहा.उन्हात जाणे टाळा: दुपारी १२ ते ४ या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळा. बाहेर पडताना फिकट रंगाचे, सुती आणि सैल कपडे परिधान करा. डोक्यावर टोपी, रुमाल किंवा छत्रीचा वापर करा लिंबू सरबत, ताक, लस्सी किंवा ओआरएस यांसारख्या पेयांचे सेवन करा. मसालेदार आणि जड अन्न टाळा तीव्र डोकेदुखी, उलट्या, घाम येणे थांबणे किंवा शुद्ध हरपणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या सरकारी रुग्णालयात संपर्क साधावा.रुग्णालय प्रशासन उष्माघाताच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घ्यावी
डॉ योगीराज शिंदे उपजिल्हा रुग्णालय मनमाड
---------------
हिंदुस्थान समाचार / GOSAVI CHANDRASHEKHAR SUKDEV