
रायगड, 04 मे (हिं.स.) : मुंबई-गोवा महामार्गावरील कर्नाळा खिंड परिसरात रविवारी दुपारी भीषण अपघात घडला. साखरपुडा समारंभासाठी निघालेला टेम्पो ट्रॅव्हलर चालकाचे नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला पलटी झाला. या अपघातात सुमारे १० प्रवासी जखमी झाले असून सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, टेम्पो ट्रॅव्हलरमधून कुटुंबीय आणि नातेवाईक समारंभासाठी प्रवास करत होते. कर्नाळा खिंडीत असलेल्या तीव्र वळणावर वाहनाचा वेग जास्त असल्याने चालकाचा ताबा सुटला आणि वाहन थेट रस्त्याच्या कडेला उलटले. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक, महामार्ग पोलीस आणि पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून त्वरित जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली असून काहींवर उपचार सुरू आहेत.
अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक पुन्हा सुरळीत केली.
कर्नाळा खिंड परिसरात तीव्र वळणे, उतार आणि भरधाव वेगामुळे वारंवार अपघात होत असल्याने वाहनचालकांनी विशेष सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
--------------------------
हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)