
- वाढलेल्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांना अधिक
अमरावती, 06 मे (हिं.स.)
खरीप हंगामाचा काळ जवळ आला असताना काही दिवसातच शेतकरी बि-बियाण्याची खरेदी करतात. नेमका खरीप हंगामास प्रारंभ होत असताना बाजारात आता सोयाबीन ६३६१ रु. व कापूस ८८०० रु. पोहचून दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. सरत्या हंगामात या दोन्ही पिकांना मिळालेला हा सर्वांतमहत्तम दर आहे. दरम्यान, या वाढलेल्या दरांचा लाभ शेतकऱ्यांना कमी व व्यापाऱ्यांना अधिक मिळाला आहे. सोयाबीनमध्ये झालेली दरवाढ बियाण्यांसाठी कंपनीचे प्रतिनिधी उतरल्याने वधारल्याचे सांगण्यात येत आहे.
मंगळवारी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनला ५९०० ते ६३६१ रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, तर कापसाला आठ हजार ६०० ते ८८०० रुपये भाव खरेदीदारांनी दिलेत. हमीदराच्या तुलनेत हे दर सर्वाधिक आहेत. वर्ष २०२५ च्या खरीप हंगामात सोयाबीनला पाच हजार रुपये हमीदर जाहीर करण्यात आला होता, याच दराने शासकीय खरेदीही करण्यात आली. खुल्या बाजारात सोयाबीनला हमीदरापेक्षा कमी दर असल्याने शासकीय खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला असला तरी निर्धारित लक्षांकामुळे शेतकऱ्यांना त्याचा फार लाभमिळाला नाही. कापसाचीही सीसीआयच्या माध्यमातून खरेदी करण्यात आली.शासकीय खरेदी बंद झाल्यानंतर शेतमालाचे दर वधारतील, अशी अपेक्षा होती. मात्र हंगाम आटोपत आला असताना व नवीन हंगामास प्रारंभ होत असताना सोयाबीन आणि कापसाचे दर वधारलेत. वधारलेल्या दरांचा शेतकऱ्यांना कितपत लाभ मिळतो, हा प्रश्न मात्र कायम आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी