
अमरावती, 06 मे (हिं.स.)। यंदाच्या खरीप हंगामात शेतकऱ्यांना खतटंचाई व दरवाढीसोबतच सोयाबीन आणि ज्वारीच्या बियाण्यातील दरवाढीचाही सामना करावा लागणार आहे. सोयाबीनच्या दरांमध्ये प्रति बॅग ५५० ते ६६० रुपये तर, ज्वारीच्या किंमतीत ३० रुपयांनी वाढ झाली आहे. तूर, मूग आणि उडदाच्या किमती मात्र स्थीर असून कापसाच्या बियाण्यामध्येही यंदा वाढ झालेली नाही. महाबीजने या किमती जाहीर केल्या असून आता खासगी कंपन्यांचे दर यावर आधारित राहणार आहेत. खरीप हंगामाच्या पूर्वतयारीस प्रारंभ झाला असून शेतकऱ्यांनी खत व बियाण्यांची जुळवाजुळव सुरू केली आहे. युरिया व डीएपीच्या विक्रीवर मर्यादा आणण्यात आली असल्याने शेतकऱ्यांची कोंडी झाली असतानाच बियाण्यातील दरवाढही अडचणीची ठरणारी आहे.
अमरावती जिल्हा कोरडवाहू पट्टा असून खरीप हंगामात सोयाबीन, कापूस व तूर ही या हंगामातील महत्त्वाची व मुख्य पिके आहेत. जिल्ह्यात सोयाबीनच्या पेरणीखाली मोठे क्षेत्र असून यंदा सोयाबीन बियाण्यांचे दर चांगलेच वधारले आहेत. १५ वर्षांवरील वाणांना शेतकऱ्यांकडून अधिक मागणी आहे. या वाणाच्या बियाण्यांमध्ये प्रति बॅग ६६० रुपये इतकी वाढ झाली, तर पाच ते १५ वर्षांच्या वाणांच्या बियाण्याचे दर ५५० रुपयांनी वधारले आहेत. ज्वारीचे पेरणी क्षेत्र तुलनेने कमी असले तरी ज्वारीला वाढलेली मागणी बघता यंदा क्षेत्रवाढीची शक्यता आहे. महाबीजने ज्वारीच्या बियाण्यांमध्ये तीस रुपयांनी वाढ केली आहे. तीस किलोच्या बॅगसाठी शेतकऱ्यांना यंदा ४९५ रुपये मोजावे लागणार आहेत. शेतकऱ्यांना एकरी तीन ते चार बॅग लागतात. मूग, उडीद व तुरीचे बियाणे दर मात्र स्थिर आहेत. मूग व उडीदच्या पाच किलो बॅगसाठी अनुक्रमे १०२५ रुपये व एक हजार रुपये मोजावे लागणार आहेत. तर तुरीच्या दोन किलोच्या बॅगसाठी ४५० रुपये इतकी किंमत द्यावी लागणार आहे. मूग व उडदाचे प्रति एकरी पाच बॅग व चार ते सहा किलो प्रति एकरी तुरीचे बियाणे लागतात. कापसाच्या बियाण्यांचे दरही यंदा गतवर्षी इतकेच आहेत. ९०० रुपये प्रति पाकीट असे दर आहेत.
महाबीजने बाजारात या वाणांचे बियाणे उपलब्ध करून दिले असून सोयाबीनचे १५ ते १७ हजार क्विंटल, तुरीचे ३५० ते ४०० क्विंटल तर उडीद व मुगाचे प्रत्येकी १०० क्विंटल बियाणे उपलब्ध केले आहेत. ज्वारी व मक्याचे बियाणे मागणीनुसार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक संजय देशमुख यांनी सांगितले.
---------------
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी