
परीक्षेत 56,880 उमेदवार यशस्वी
नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। भारतीय तंत्रज्ञान संस्था (आयआयटी) रुडकीने आज संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) ॲडव्हान्स्ड-2026 चा निकाल जाहीर केला. यंदा दिल्ली झोनच्या शुभम कुमारने 360 पैकी 330 गुण मिळवत देशात प्रथम क्रमांक पटकावला. दुसऱ्या स्थानावर दिल्ली झोनचाच कबीर छिल्लर राहिला. त्याने 329 गुण मिळवले, तर जतिन चाहरने 319 गुणांसह तिसरा क्रमांक मिळवला. अशा प्रकारे अव्वल तीनही स्थानांवर दिल्ली झोनच्या उमेदवारांचे वर्चस्व राहिले.
आयआयटी रुडकीने निर्धारित वेळेपूर्वी निकाल जाहीर करत अंतिम उत्तरसूचीही प्रसिद्ध केली. उमेदवारांना अधिकृत संकेतस्थळावर रोल क्रमांक, जन्मतारीख आणि नोंदणीकृत मोबाईल क्रमांकाच्या साहाय्याने निकाल पाहता येणार आहे.यावर्षी जेईई ॲडव्हान्स्डसाठी 1,87,389 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 1,79,694 उमेदवार परीक्षेला बसले आणि 56,880 उमेदवार यशस्वी घोषित करण्यात आले. यशस्वी उमेदवार आता भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील प्रवेशासाठी संयुक्त सीट वाटप प्रक्रिया (जोसा) समुपदेशनात सहभागी होऊ शकतील. यशस्वी उमेदवारांमध्ये 10,107 विद्यार्थिनींचाही समावेश आहे.
यंदा सर्वसाधारण प्रवर्गाची कट-ऑफ 92 गुणांवर पोहोचली असून ती गेल्या वर्षाच्या तुलनेत 18 गुणांनी अधिक आहे. विषयनिहाय कट-ऑफ 8 गुण निश्चित करण्यात आली आहे. सुमारे 31.65 टक्के परीक्षार्थी यशस्वी ठरले असून, गेल्या काही वर्षांच्या तुलनेत ही कामगिरी अधिक चांगली मानली जात आहे.झोननिहाय कामगिरीतही अनेक विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश मिळवले. आयआयटी दिल्ली झोनमधील शुभम कुमारने प्रथम क्रमांक पटकावला. आयआयटी मद्रास झोनचा मोहित शेखर शुक्ला चौथ्या स्थानावर राहिला. आयआयटी मुंबई झोनच्या बी. जयकृष्ण श्रीनिवासने सहावा क्रमांक मिळवला. आयआयटी रुडकी झोनचा निकुंज अग्रवाल 11व्या, आयआयटी कानपूर झोनचा रिद्धेश अनंत बेंडाले 18व्या, तर आयआयटी भुवनेश्वर झोनचा भावेश पात्र 29व्या स्थानावर राहिला. आयआयटी गुवाहाटी झोनच्या यशराज सिंहने 122वा क्रमांक मिळवला.
महिला उमेदवारांमध्ये आयआयटी दिल्ली झोनची आरोही देशपांडे अव्वल ठरली. तिने 360 पैकी 280 गुण मिळवत अखिल भारतीय गुणवत्ता यादीत 77वे स्थान मिळवले.विशेष म्हणजे, जेईई ॲडव्हान्स्ड ही देशातील 23 भारतीय तंत्रज्ञान संस्थांमधील पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठीची प्रमुख परीक्षा आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आता यशस्वी उमेदवारांसाठी सीट वाटप आणि प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule