सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींसह अनके मान्यवरांनी व्यक्त केले दुःख
नवी दिल्ली , 01 जून (हिं.स.)।ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी मुंबईतील निवासस्थानी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्या वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांनी त्रस्त होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह
सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान मोदींसह अनके मान्यवरांनी व्यक्त केले दुःख


नवी दिल्ली , 01 जून (हिं.स.)।ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचे रविवारी मुंबईतील निवासस्थानी वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्या वयोमानानुसार उद्भवलेल्या आरोग्य समस्यांनी त्रस्त होत्या. सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक नेत्यांनी शोक व्यक्त केला. त्यांनी सुमन कल्याणपूर यांच्या सुरेल आवाजाची आणि हृदयस्पर्शी गायकीची आठवण काढली. त्यांच्या निधनानंतर अनेक नेते आणि मान्यवरांनीही दुःख व्यक्त केले आहे.

‘एक्स’वरील एका पोस्टमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले, “लोकप्रिय गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या सुरेल आवाजाने आणि हृदयाला स्पर्श करणाऱ्या गायकीने आपल्या सांस्कृतिक विश्वाला समृद्ध केले. आपल्या गीतांद्वारे त्यांनी संगीतप्रेमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीच्या चाहत्यांच्या मनात एक विशेष स्थान निर्माण केले. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि चाहत्यांप्रती माझ्या संवेदना. ॐ शांती.”

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सुमन कल्याणपूर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वातील एक मधुर, सुरेल आणि आत्म्याला स्पर्श करणारा आवाज कायमचा हरपला आहे. सहा दशकांहून अधिक काळ त्यांनी आपल्या अप्रतिम गायकीने संगीतप्रेमींच्या हृदयावर अधिराज्य गाजवले. मराठी, हिंदी, बंगाली, ओडिया आणि इतर भाषांमधील त्यांनी गायलेली अजरामर गीते ही संगीतविश्वाची अमूल्य संपत्ती आहे.

‘पद्मभूषण’ पुरस्काराने सन्मानित सुमनजींनी आपल्या जादुई आवाजाने भारतीय संगीत अधिक समृद्ध केले. त्यांच्या गीतांतील माधुर्य आणि भावस्पर्शीपणा सदैव आपल्या स्मरणात राहील. त्यांचे निधन हे संगीतविश्वासाठी मोठी हानी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. ॐ शांती.”

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही शोक व्यक्त करताना म्हटले, “मराठी भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपटगीतांमधून त्यांनी आपल्या गायकीची अमिट छाप उमटवली. केवळ मराठीच नव्हे तर हिंदी, गुजराती आणि बंगाली भाषांमधील असंख्य गीतांना त्यांनी आपला आवाज दिला. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेत भारत सरकारने २०२३ मध्ये त्यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक असलेल्या ‘पद्मभूषण’ पुरस्काराने गौरविले. आज त्या आपल्यात नसल्या तरी त्यांचा आवाज अमर आहे. काळ पुढे सरकत राहील, पिढ्या बदलत राहतील; मात्र सुमन कल्याणपूर यांचा मधुर आणि हृदयस्पर्शी स्वर भारतीय संगीतविश्वात कायम घुमत राहील. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.”

यापूर्वी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले. त्यांनी ‘एक्स’वर लिहिले, “भारतीय संगीतविश्वातील लोकप्रिय, ज्येष्ठ आणि दिग्गज गायिका, पद्मभूषण सुमन कल्याणपूर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. सुमन कल्याणपूर यांचे जाणे ही भारतीय संगीतविश्वासाठी मोठी हानी आहे. त्यांनी मराठी, हिंदी आणि इतर अनेक भाषांमधील हजारो गीतांना आपल्या आवाजाने अजरामर केले.”

सुमन कल्याणपूर यांचा जन्म २८ जानेवारी १९३७ रोजी सुमन हेम्माडी या नावाने झाला होता. त्यांनी सात दशकांहून अधिक काळाचा अत्यंत यशस्वी आणि गौरवशाली संगीतप्रवास केला. त्यांच्या गाजलेल्या गीतांमध्ये ‘ना तुम हमें जानो’, ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘ना ना करते प्यार’, ‘मेरा प्यार भी तू है’, ‘दिल एक मंदिर है’, ‘बहना ने भाई की कलाई पे’ तसेच अनेक लोकप्रिय मराठी गाण्यांचा समावेश आहे.

त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, गुजराती आणि इतर भारतीय भाषांमध्ये हजारो गीते ध्वनिमुद्रित केली. भारतीय संगीत क्षेत्रातील त्यांच्या अमूल्य योगदानाची दखल घेत त्यांना २०२३ मध्ये भारत सरकारकडून ‘पद्मभूषण’ या प्रतिष्ठेच्या नागरी सन्मानाने गौरविण्यात आले होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / Priyanka Bansode


 rajesh pande