
महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना पेरणी न करण्याचा सल्ला
नवी दिल्ली, 01 जून (हिं.स.)। संपूर्ण देशाच्या उत्सुकतेचा विषय ठरणाऱ्या नैऋत्य मान्सूनचे अखेर केरळमध्ये आगमन झाले असून भारतीय हवामान विभागाने सोमवारी याबाबत अधिकृत घोषणा केली. उष्णता आणि उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांसाठी ही मोठी दिलासादायक बातमी मानली जात आहे. केरळच्या किनारपट्टीवर मान्सून दाखल झाल्यानंतर केरळ राज्यात पुढील काही दिवसांत जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतातील मान्सूनच्या प्रगतीसाठी केरळमधील आगमन हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा मानला जात असल्याने देशभरातील शेतकरी, हवामान तज्ज्ञ आणि प्रशासनाचे लक्ष आता मान्सूनच्या पुढील वाटचालीकडे लागले आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हवामान विभागाने केरळ राज्यातील सात जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केली आहे. अलप्पुझा, कोट्टायम, एर्नाकुलम, त्रिशूर आणि मलप्पुरम या जिल्ह्यांसाठी बुधवार आणि गुरुवार या दोन्ही दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच पतनमतिट्टा आणि कोझिकोड या जिल्ह्यांसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार या जिल्ह्यांतील काही भागांमध्ये अल्प कालावधीत ११ ते २० सेंटीमीटरपर्यंत पाऊस पडू शकतो.
मुसळधार पावसामुळे शहरी भागांमध्ये अचानक पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला असून डोंगराळ आणि घाटमाथ्याच्या प्रदेशांमध्ये दरडी कोसळण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणांनी निरीक्षण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे. पूरप्रवण आणि संवेदनशील भागांतील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे. तर केरळ राज्यातील इतर अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जाहीर करण्यात आली असून व्यापक पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मान्सूनच्या प्रभावामुळे किनारपट्टी भागात समुद्र खवळलेला राहण्याची आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना समुद्रात मासेमारीसाठी न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
दरम्यान,मान्सून आता दक्षिण भारतातून टप्प्याटप्प्याने पुढे सरकत महाराष्ट्रासह देशाच्या इतर भागांकडे वाटचाल करणार आहे. मात्र महाराष्ट्रातील नागरिक आणि शेतकऱ्यांना अद्याप काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रादेशिक हवामान विभागाच्या माहितीनुसार राज्यातील बहुतांश भागांमध्ये किमान १० जूनपर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही.
सध्या राज्यात अनेक ठिकाणी पावसाच्या सरी कोसळत असल्या तरी हा मान्सूनचा पाऊस नसून मान्सूनपूर्व पाऊस आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि खानदेश या भागांमध्ये दुपारनंतर ढगाळ वातावरण निर्माण होऊन वादळी पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. या पावसाचा मान्सूनच्या प्रगतीशी थेट संबंध नसल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे दमदार आणि सातत्यपूर्ण पाऊस पडून मान्सून स्थिरावल्याची अधिकृत माहिती मिळेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
मान्सून केरळमध्ये दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी भारतीय हवामान विभाग काही ठरावीक निकषांचा आधार घेतो. हवामान विभागाचे अधिकारी के. एस. होसाळीकर यांनी यापूर्वी याबाबत माहिती दिली होती. त्यानुसार १० मेनंतर केरळमधील १४ हवामान केंद्रांपैकी किमान ६० टक्के केंद्रांवर सलग दोन दिवस २.५ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पावसाची नोंद होणे आवश्यक असते. याशिवाय पश्चिमेकडून वाहणारे वारे ठरावीक उंचीपर्यंत आणि आवश्यक वेगाने वाहणे तसेच वातावरणातील दीर्घतरंगीय प्रारणाचे प्रमाण निश्चित मर्यादेपेक्षा कमी असणे हे निकषही पूर्ण होणे गरजेचे असते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Suraj Chaugule