
कोलकाता, 01 जून (हिं.स.)तृणमूल काँग्रेसने पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावरून आपले दोन आमदार संदीपन साहा आणि ऋतब्रता बॅनर्जी यांना पक्षातून काढले आहे. पक्षाने म्हटले आहे की, संदीपन आणि ऋतब्रता यांना टीएमसीच्या प्राथमिक सदस्यत्वातून काढून टाकण्यात आले आहे. राज्य सचिवालयात आयोजित पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी, या दोघांनी विधानसभेतील 'बनावट सही' प्रकरणी तक्रार दाखल केल्याचे सांगितल्यानंतर काही मिनिटांतच टीएमसीने हा आदेश जारी केला. हे प्रकरण शोवनदेव चट्टोपाध्याय यांच्या विरोधी पक्षनेतेपदी नियुक्तीशी संबंधित आहे. टीएमसीने शोवनदेव यांना विरोधी पक्षनेते बनण्यासाठी पाठिंबा दिला होता.
दोन्ही आमदारांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, ऑल इंडिया तृणमूल काँग्रेसच्या सक्षम प्राधिकरणामार्फत हे निदर्शनास आणून देण्यात आले आहे की, एआयटीसीने नामनिर्देशित उमेदवार म्हणून निवड करूनही, आपण पक्षाच्या अधिकृत नेतृत्वाने बोलावलेल्या बैठकांना वारंवार गैरहजर राहिला आहात आणि पक्षविरोधी कारवायांमध्ये सहभागी झाला आहात.
पत्रात असे लिहिले आहे की, तुम्ही एआयटीसीच्या हितास बाधा आणणाऱ्या कारवायांमध्ये सहभागी झाला आहात आणि अशी वक्तव्ये केली आहेत, हेदेखील निदर्शनास आले आहे. या प्रकरणाचा काळजीपूर्वक विचार केल्यानंतर, एआयटीसीच्या संबंधित प्राधिकरणाने तुम्हाला पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून तात्काळ प्रभावाने काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
शोभनदेव चट्टोपाध्याय यांना विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्त करण्यासाठी विधानसभा सचिवालयाला पाठवलेल्या पत्रात पक्षाच्या आमदारांच्या बनावट सह्या वापरल्याच्या आरोपाची पश्चिम बंगाल सीआयडी चौकशी करत आहे.
---------------
हिंदुस्थान समाचार / वृषाली देशपांडे