₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी वैध चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
नांदेड, 11 जून (हिं.स.) : भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ₹5 च्या नोटा तसेच ₹20 ची नाणी ही पूर्णपणे कायदेशीर चलन (लीगल टेंडर) असून सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये त्यांचा स्वीकार करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी या नोटा आणि नाण्यांचा स्वीक
₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी वैध चलन; स्वीकार करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन


नांदेड, 11 जून (हिं.स.) : भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या ₹5 च्या नोटा तसेच ₹20 ची नाणी ही पूर्णपणे कायदेशीर चलन (लीगल टेंडर) असून सर्व प्रकारच्या व्यवहारांमध्ये त्यांचा स्वीकार करणे बंधनकारक आहे. मात्र, काही ठिकाणी या नोटा आणि नाण्यांचा स्वीकार करण्यास नकार दिला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी नागरिकांना आणि व्यापारी वर्गाला महत्त्वाचे आवाहन केले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले की, भारतीय रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या सर्व चलनी नोटा आणि नाणी वैध असून त्यांचा स्वीकार करण्यास नकार देणे अयोग्य आहे. त्यामुळे जिल्ह्यातील व्यापारी, व्यावसायिक प्रतिष्ठाने, शासकीय व निमशासकीय कार्यालये तसेच बँकांनी ₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी कोणत्याही शंका किंवा गैरसमजाशिवाय स्वीकारावीत.

याबाबत बँका, व्यापारी संघटना आणि संबंधित संस्थांनी नागरिकांमध्ये जनजागृती करण्याची गरज असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले. कायदेशीर चलनाबाबत निर्माण होणारे गैरसमज दूर करण्यासाठी सर्व संबंधितांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले.

नागरिकांनी कोणत्याही अफवा किंवा चुकीच्या माहितीस बळी न पडता ₹5 च्या नोटा आणि ₹20 ची नाणी व्यवहारांमध्ये स्वीकारावीत, असे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आर्थिक व्यवहार सुरळीत राहण्यास मदत होईल आणि सर्वसामान्यांना अनावश्यक अडचणींचा सामना करावा लागणार नाही.

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी सर्व नागरिक, व्यापारी आणि संस्थांनी कायदेशीर चलनाचा सन्मान राखत व्यवहार सुलभ करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले आहे.

---------------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande