ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी पहिल्याच दिवशी जुने बूट व गणवेशात; वाघुले यांची नाराजी
ठाणे, 11 जून, (हिं.स.) : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाबरोबरच पहिल्या महिन्यात जुने बूट व गणवेशावरच शाळेत यावे लागणार आहे. आचारसंहिता व निधीच्या कारणावरून गणवेशाची निविदा प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्या
ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थी पहिल्याच दिवशी जुने बूट व गणवेशात; वाघुले यांची नाराजी


ठाणे, 11 जून, (हिं.स.) : ठाणे महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना पहिल्या दिवसाबरोबरच पहिल्या महिन्यात जुने बूट व गणवेशावरच शाळेत यावे लागणार आहे. आचारसंहिता व निधीच्या कारणावरून गणवेशाची निविदा प्रक्रिया राबविण्यास उशीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांना फटका बसणार आहे. या प्रकाराबद्दल भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

दरवर्षी महापालिकेच्या शाळांमधील सुमारे २४ हजार विद्यार्थ्यांना बूट, गणवेश आणि इतर शैक्षणिक साहित्याचे वाटप केले जाते. शाळेच्या पहिल्या दिवशी मुलांना गणवेश मिळणे आवश्यक असते. मात्र, यंदा विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी नव्हे तर जून महिन्यातही गणवेश व बूट मिळणार नाहीत. यापूर्वी सातत्याने महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश उशीरा मिळत होते. मात्र, गेल्या वर्षी प्रशासनाने मेच्या पंधरवड्यात निविदा प्रक्रिया सुरू केली होती. मात्र, यंदा निविदा प्रक्रिया रखडली आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थातील निवडणूक व अर्थसंकल्प मंजुरीच्या कारणामुळे निविदा प्रक्रिया रखडल्याचे कारण प्रशासनाकडून अनौपचारिकरित्या दिले जात आहे. मात्र, त्यावर ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी तीव्र नाराजी केली. महापालिकेच्या शाळा दरवर्षी १५ जूनच्या सुमारास सुरू होणे अपेक्षित असते. त्यानुसार प्रशासनाने गणवेशाची निविदा प्रक्रियेची तयारी सुरू करण्याची आवश्यकता होती. अर्थसंकल्पाला मंजुरी नसल्याचे कारण सांगण्यात येत असले, तरी ते चुकीचे आहे, असे मत संजय वाघुले यांनी व्यक्त केले.

दरम्यान, येत्या १८ जून रोजी होणाऱ्या महासभेत प्रशासनाने दोन वर्षांसाठी गणवेश पुरवण्यासाठी निविदा मागविण्याचा प्रस्ताव सादर केला आहे.

चौकट

---------------------

७२ ब अन्वये गणवेशाचा

प्रस्ताव का मांडला नाही?

आतापर्यंत झालेल्या चार महासभांमध्ये महापालिकेने शेकडो प्रस्ताव ७२ ब अन्वये मंजूर केले आहेत. गणवेशासाठीचाही प्रस्ताव ७२ ब अन्वये सादर केला असता, तर त्याला सर्वपक्षीय मंजुरी मिळाली असती. त्यामुळे गणवेश निविदा प्रक्रिया रखडण्यासाठी प्रशासन दोषी आहे, असा आरोप ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले यांनी केला.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande