अहेरीत प्रशासकीय अधिकारी मारहाण : काँग्रेसचे अजय कंकडालवार यांना १३ जूनपर्यंत पोलीस कोठडी
गडचिरोली., 11 जून (हिं.स.) अतिक्रमित इमारत पाडल्याचा राग मनात धरून अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या खळबळजनक प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेच
काँग्रेस नेते अजय कंकडाळवार


गडचिरोली., 11 जून (हिं.स.)

अतिक्रमित इमारत पाडल्याचा राग मनात धरून अहेरी नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव सुभाष पांढरे (वय ३४) यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या खळबळजनक प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी काँग्रेस नेते तथा गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अजय कंकडालवार यांना अटक केली आहे.

पोलिसांनी कंकडालवार यांना बुधवारी गडचिरोली येथून ताब्यात घेतले होते.त्यानंतर आज, गुरुवारी त्यांना चामोर्शी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १३ जून (शनिवार) पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणातील अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून अहेरी पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मॉर्निंग वॉक दरम्यान गाठून हल्ला

अहेरी येथील साई तीर्थ नगरीत राहणारे नगर पंचायतीचे प्रशासकीय अधिकारी वैभव पांढरे हे बुधवार, १० जून रोजी सकाळी ७:३० वाजताच्या सुमारास इंदाराम रोडवर नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी गेले होते. आबनपल्ली फाटा ते चेरपल्ली फाटा दरम्यान, प्रशांत भागवत यांच्या शेताजवळ आरोपींनी चारचाकी वाहनाने पांढरे यांना गाठले.

अजय कंकडालवार यांच्या मालकीची अतिक्रमित इमारत प्रशासनाने पाडल्याचा राग आरोपींच्या मनात होता. याच कारणावरून आरोपींनी संगनमत करून पांढरे यांना रस्त्यात अडवले, शिवीगाळ केली आणि जिवे मारण्याच्या उद्देशाने लाकडी फळीने त्यांच्यावर जोरदार हल्ला चढवला. या हल्ल्यात पांढरे यांच्या डोक्यावर, डोळ्याच्या वर कपाळावर आणि डाव्या हातावर गंभीर दुखापत झाली आहे.

माजी जि.प. अध्यक्षांसह चौघांवर गुन्हे दाखल

जखमी वैभव पांढरे यांनी दिलेल्या बयानावरून आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या लेखी अभिप्रायानंतर अहेरी पोलिसांनी चार आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवला होता.

या प्रकरणात तीन आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून त्यांचा शोध सुरू असल्याचे सांगितले.

'भारतीय न्याय संहिता' (BNS) अन्वये कारवाई

या सर्व आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS 2023) च्या कलम १०९(१) (जिवे मारण्याचा प्रयत्न), ११५(२), ३५२, ३५१(२), आणि ३(५) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सदर गुन्हा सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि) मंगेश वळवी यांनी दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

कर्मचारी संघटनांकडून तीव्र निषेध आणि कठोर कारवाईची मागणी

कर्तव्यावर असलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यावर झालेल्या या भ्याड व प्राणघातक हल्ल्यामुळे जिल्ह्यातील प्रशासकीय वर्तुळात तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठिकठिकाणी विविध नगरपरिषद आणि नगरपंचायत कर्मचारी संघटनांनी या घटनेचा तीव्र निषेध केला असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande