अमरावती ग्रामीणमध्ये 22 जूनपासून हेल्मेट सक्ती
अमरावती, 11 जून (हिं.स.) : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अमरावती ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चालकांसह मागील आसनावरील प्रवाशांसाठीही हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात पोलीस अ
हेल्मेटशिवाय दुचाकी चालविणाऱ्यांवर होणार कारवाई अमरावती ग्रामीण पोलिसांची २२ जूनपासून विशेष मोहीम


अमरावती, 11 जून (हिं.स.) : वाढत्या रस्ते अपघातांना आळा घालण्यासाठी आणि नागरिकांच्या जीविताचे संरक्षण करण्याच्या उद्देशाने अमरावती ग्रामीण पोलिसांनी दुचाकी चालकांसह मागील आसनावरील प्रवाशांसाठीही हेल्मेट वापरणे बंधनकारक केले आहे. यासंदर्भात पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून जाहिरनामा जारी करण्यात आला असून 22 जून 2026 पासून विशेष अंमलबजावणी मोहीम राबविण्यात येणार आहे.

नवीन निर्देशांनुसार जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, राज्य महामार्ग तसेच ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रस्त्यांवर दुचाकी चालक आणि मागील आसनावरील प्रवाशांनी हेल्मेट घालणे अनिवार्य राहणार आहे.

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, हेल्मेटशिवाय वाहन चालविताना किंवा प्रवास करताना आढळणाऱ्यांवर मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई करण्यात येईल.

हेल्मेट नियमाचे गंभीर उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करण्यात येणार आहे. अशा प्रकरणांमध्ये संबंधितांचे ड्रायव्हिंग लायसन्स तीन महिन्यांसाठी निलंबित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.

अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक निकेतन कदम यांनी नागरिकांना हेल्मेट वापरण्याचे आवाहन केले आहे.

“सुरक्षित प्रवास, सुरक्षित परिवार” हा संदेश देताना त्यांनी म्हटले की, हेल्मेट हे केवळ दंड टाळण्याचे साधन नसून स्वतःच्या आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी प्रभावी कवच आहे. रस्ते अपघातांमध्ये होणाऱ्या गंभीर दुखापती आणि मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रत्येकाने हेल्मेटचा नियमित वापर करणे आवश्यक आहे.

पोलिसांकडून जनजागृती मोहिमेसोबतच नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येणार असून नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षिततेसाठी हेल्मेट वापरून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande