गडचिरोली : जलसंधारण कामे गतीने पूर्ण करा- जिल्हाधिकारी
गडचिरोली, 11 जून (हिं.स.) : आगामी काळात संभाव्य एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी
आढावा बैठक


गडचिरोली, 11 जून (हिं.स.) : आगामी काळात संभाव्य एल निनो परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व जलसंधारण व पाणी साठवण क्षमता वाढविणाऱ्या योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी संबंधित यंत्रणांना दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित जलयुक्त शिवार अभियान 2.0, प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) 2.0 तसेच गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

बैठकीत जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध जलसंधारण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जलयुक्त शिवार अभियान 2.0 अंतर्गत विशेष निधी व अभिसरणातून एकूण 6,516 कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यापैकी 5,134 कामांना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. आतापर्यंत 4,680 कामे पूर्ण झाली असून अभियानाची एकूण प्रगती 91 टक्क्यांपर्यंत पोहोचली आहे. विशेष निधीतील 97 टक्के तर अभिसरणातील 87 टक्के कामे पूर्ण झाल्याची माहिती जिल्हा जलसंधारण अधिकारी अमित राऊत यांनी दिली.

जिल्हाधिकाऱ्यांनी उर्वरित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्यावर भर देत सर्व विभागांनी समन्वय साधण्याचे निर्देश दिले. तसेच पूर्ण झालेल्या कामांचे भू-अंकन (जिओ टॅगिंग) लवकरात लवकर पूर्ण करून माहिती अद्ययावत ठेवण्याचेही त्यांनी सांगितले. सध्या सुमारे 30 टक्के कामांचे जिओ टॅगिंग पूर्ण झाले असून उर्वरित कामे तातडीने पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना (PMKSY) 2.0 अंतर्गत जिल्ह्यातील चार प्रकल्पांमध्ये एकूण 1,128 कामांना मान्यता देण्यात आली असून त्यापैकी 1,029 कामे पूर्ण झाली आहेत. योजनेची भौतिक प्रगती 85 टक्क्यांहून अधिक असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

गाळमुक्त धरण-गाळयुक्त शिवार अभियानांतर्गत आतापर्यंत सुमारे 7.54 लाख घनमीटर गाळ काढण्यात आला असून 29 कामे पूर्ण झाली आहेत. उर्वरित कामे निर्धारित कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित संस्थांना दिल्या.

बैठकीत भूजल पातळी वाढवणे, सिंचन क्षमता सुधारणे आणि पाणी उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला. संभाव्य एल निनोमुळे पर्जन्यमानावर परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेता पाणी संवर्धन व कार्यक्षम वापरासाठी सर्व यंत्रणांनी अधिक प्रभावीपणे काम करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी केले.

या बैठकीस विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Milind Khond


 rajesh pande