
लातूर, 12 जून (हिं.स.) : महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय लातूर यांच्या वतीने सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 50 टक्के अनुदान योजना, बीजभांडवल योजना आणि थेट कर्ज योजनांसाठी पात्र लाभार्थ्यांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनांअंतर्गत 50 टक्के अनुदान योजनेसाठी 35, बीजभांडवल योजनेसाठी 35 आणि थेट कर्ज योजनेसाठी 70 लाभार्थ्यांचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले आहे. या योजनांचा लाभ अनुसूचित जाती व नवबौद्ध समाजातील (मांग, मातंग, चांभार व खाटीक वगळून) गरजू लाभार्थ्यांना मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी https://mahadisha.mpbcdc.in या संकेतस्थळाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे. लाभार्थ्यांचे वय 18 ते 50 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
ऑनलाईन अर्ज करताना जाती व उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, रेशनकार्ड, आधार, पॅन, मतदान ओळखपत्र, बँक पासबुक (आधार लिंक), शैक्षणिक कागदपत्रे, व्यवसाय कोटेशन, जागेचा पुरावा, उद्यम आधार, शॉप ॲक्ट, प्रशिक्षण किंवा अनुभव प्रमाणपत्र आणि दोन पासपोर्ट साईझ फोटो यांसारखी कागदपत्रे आवश्यक आहेत. ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर त्याच्या दोन प्रती शिवनेरी गेटसमोरील जुनी डालडा फॅक्टरी येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनातील महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ कार्यालयात जमा करणे आवश्यक आहे.जिल्ह्यातील जास्तीत जास्त गरजू लाभार्थ्यांनी वेळेत अर्ज करून या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाचे लातूर जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
---------------------------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis